
जनावरांपासून पिकाचा बचाव करण्यासाठी अनधिकृतरित्या शेतात विद्युत करंट लावण्यात आला होता. हा विद्युत करंट लागल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील खांबा येथे ही घटना घडली. शैलेश संजू रहांगडाले असे मयत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. साकोली पोलीस पुढील तपास करत आहेत.
घटनेतील पहिला आरोपी नाजूक रघुनाथ रहांगडाले हा यांनी गावातील पोलीस पाटील डोंगरे यांचे शेत कसण्यासाठी ठेकेदारी पद्धतीने घेतले होते. शेतातील उसाच्या पिकाचा जनावरांपासून बचाव व्हावा आणि नासाडी होऊ नये म्हणून त्यांनी शेतात अनधिकृतरित्या विद्युत करंट लावून ठेवला होता.
विद्युत करंटमुळे जीवाला धोका होऊ शकतो हे माहित असतानादेखील दूर राहून दुसरा आरोपी पियुष रहांगडाले याने मयत शैलेशला शेतात पाहणीसाठी पाठवले. यावेळी शैलेशचा करंट लागून मृत्यू झाला.
शैलेशचा मृत्यू झालेला पाहून पियुषने नाजूक याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी शेतातील विद्युत प्रवाह बंद करुन शैलेशचा मृतदेह शेतातून उचलून शेततळ्यात फेकला. स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केले.
मात्र घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.