फोटो काढण्यासाठी साप हातात घेतला, पण क्षणात जे घडलं ते भयंकरच!

बुलढाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत नको ते धाडस करणं एका तरुणाला महागात पडले आहे. वाढदिवसाच्या पार्टीत फोटोसाठी हातात धरलेल्या सापाने दंश केल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यातील चिखली शहरात ही घटना घडली आहे. संतोष जगदाळे असे मयत तरुणाचे नाव आहे.

संतोष जगदाळे याचा 5 जुलै रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी संतोषचे दोन मित्र आरिफ खान आणि धिरज पंडितकर त्याच्या घरी आले. मग तिघेही सेलिब्रेशनसाठी बाहेर गेले. आरिफ आणि धिरज दोघेही सर्पमित्र आहेत. त्यांनी वाढदिवसाच्या पार्टीला येताना बरणीतून एक साप सोबत आणला होता.

धिरजने फोटो काढण्यासाठी साप हातात घेण्यास संतोषला सांगितले. मात्र संतोषने सापाला हातात धरताच सापाने त्याला दंश केला. यामुळे संतोषचे दोघेही मित्र घाबरले. त्यांनी संतोषला तात्काळ खाजगी रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात उपचार पूर्ण होण्याआधीच आरिफ आणि धिरजने त्याला डिस्चार्ज घेतला आणि घरी नेऊन सोडले.

योग्य उपचार न मिळाल्याने संतोषचा मध्यरात्री मृत्यू झाल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी संतोषच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी आरिफ खान आणि धिरज पंडितकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.