अनुसूचित जातीतील तरुणांनी सरकारी उद्योग योजनांचा लाभ घ्यावा – सुभाष देसाई

सामना ऑनलाईन । पुणे

अनुसूचित जातीजमातीतील तरुणांनी उद्योगांकडे वळावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने अनेक योजना केल्या आहेत. या योजनांचा अधिकाधिक लाभ तरुण उद्योजकांनी घेतला तर अधिक उद्योजक घडतील आणि आपण खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील हिंदुस्थान निर्माण करू असे मत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे अनुसूचित जाती आणि जमातीच्या उद्योजकांसाठी आयोजित राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख मिलिंद कांबळे, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे संचालक पी. जी. एस. राव, पी. कृष्णमोहन, संदीप बेलसरे, सुनील झाडे, मनोज लाल, शिवसेनेचे आमदार गौतम चाबूकस्वार आदी यावेळी उपस्थित होते.

हे तरुण विजय मल्ल्या नाहीत!
अनुसूचित जातीजमातीतील माझे तरुण उद्योजक बांधव हे कष्ट करून जगणारे आहेत. तरीही अनेक बँका त्यांना कर्ज देण्यास आडकाठी करतात. हे उद्योजक विजय मल्ल्या नाहीत. ते पैसे बुडवून पळून जाणार नाहीत, इथेच राहून आपला उद्योग करणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.