देशीकट्ट्यातून सुटलेल्या गोळीने तरुण जखमी; हल्ला झाल्याचा संशय

621

अमरावतीतील नागपुरी गेट पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या वलगाव रोडवरील धर्मकाट्याजवळ देशीकट्ट्यातून सुटलेल्या गोळीने एक तरूण जखमी झाला आहे. त्याच्यावर देशीकट्टाने हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे. मात्र, त्याने दिलेली माहिती संशयास्पद असल्याचे पोलिसांनी सांगितले असून देशीकट्ट्याची पाहणी करत असताना गोळी सुटून तो जखमी झाल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. तपासणीनंतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले. तोफेल खान सलमान खान असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.

जखमी झालेल्या तोफेलवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुफियान नगर परिसरात राहणारा तोफेल खान सलमान खान जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनास्थळी देशीकट्ट्यातून चालविलेली गोळी आढळून आली. जखमी तोफेलला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो व्यवस्थित उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यामुळे या प्रकरणाचा तापस केल्यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.

याबाबत पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सांगितले की, तोफेल हा राजापेठ ठाण्याअंतर्गत एका दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपी आहे. तसेच तो देशीकट्टा विक्रीचा धंदा करीत असल्याचाही पोलिसांना संशय आहे. त्याच्या पायाला देशीकट्टाने झालेली जखम संशयास्पद असून विक्री केलेल्या देशीकट्ट्यातून व्यवस्थित गोळी सुटते का याची पाहणी करीत असतानाच ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तोफेलवर गोळी झाडल्याप्रकरणी मसानगंज परिसरातील वैभव गुप्ता या युवकाचे नाव समोर आले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात प्रकरण घडतेवेळी तो घरीच असल्याचे स्पष्ट झाले. वैभव गुप्ता व तोफेल खान यांच्यात काही महिन्यांपासून वाद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात त्याचे नाव घेतल्याचा संशय आहे. दरम्यान, तपासानंतर अधिक बाबी स्पष्ट होतील असेही सोळंके यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या