आत्याशी होते अनैतिक संबंध, साखरपुड्यात भाच्याने घातल्या गोळ्या

आत्याशी अनैतिक संबंध असलेल्या एका तरुणाने तिची गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या आतेभावाच्या साखरपुड्यातच हा भीषण प्रकार घडला असून त्यात या तरुणाची आईही गंभीर जखमी झाली आहे.

ही घटना कल्याण येथे घडली असून पवन म्हात्रे (21) असं या तरुणाचं नाव आहे. रविवारी पवनच्या शेजारीच राहणारा त्याचा आतेभाऊ तुषार घोडे याचा साखरपुडा होता. तिथे मोठ्या आवाजात डीजे वाजत होता. त्याचा फायदा उचलत पवनने त्याची आत्या सुवर्णा घोडे (36) हिच्यावर गोळी झाडली.

गोळी वर्मी लागल्याने सुवर्णा घोडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेली पवनची आई भारती (40) यांनाही गोळी लागली आणि त्या गंभीर जखमी झाल्या.

गोळी झाडून झाल्यानंतर त्याने घरात दरोडा पडल्याचा बनाव केला आणि आपण त्यावेळी बेशुद्ध असल्याचं सांगितलं. या प्रकाराचा धक्का बसल्याचं नाटक करून तो रुग्णालयात दाखल झाला. तिथे त्याचा जबाब घेताना पोलिसांना त्याच्यावरच संशय आला.

तेव्हा त्यांनी पवनची कसून चौकशी केली. या चौकशीत तो वारंवार आपला जबाब बदलत असल्याने त्यांचा संशय बळावला. याच चौकशीदरम्यान पवनने आपणच आत्याला गोळी मारल्याची कबुली दिली.

या हत्येमागील कारण कळल्यानंतर पोलिसांना धक्का बसला. पवन याचे त्याची आत्या सुवर्णा हिच्याशी अनैतिक संबंध होते. त्या संबंधातूनच पवनने सुवर्णा हिच्यावर गोळी झाडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याअनुषंगानेच पोलीस तपास करत असून या हत्येसाठी वापरलेल्या पिस्तुलाचा शोध पोलीस घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या