चिंचवडमध्ये पूर्व वैमनस्यातून जीम ट्रेनरचा टोळक्याकडून खून

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने कोयते व पालघनच्या सहाय्याने जीम ट्रेनर तरुणावर वार करून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी रात्री चिंचवड येथे घडली. प्रेम सायबू लिंगदाळे (वय २१ रा. शामा हेरिटेज, काकडे पार्क चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मॅडी मडिवाल, राकेश सूर्यवंशी, गणेश खांगटे, गणेश कांबळे, किरण चव्हाण, योगेश फुरडे, दीपक कोल्हे, सागर परीट, अनंत साठे, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शिवानंद शंकर हेळवे (वय २३, रा. बळवंतनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण चव्हाण, दीपक कोल्हे, अनंत साठे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवानंद हेळवे आणि आरोपी मॅडी मडिवाल हे दोघे जण एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत. हेळवे व त्याच्या साथीदारांनी आरोपी मॅडी याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या रिक्षाचीही तोडफोड केली. याचा राग मनात धरून आरोपी मॅडी व त्याचे साथीदार हे कोयते व पालघन घेऊन बळवंतनगर येथे आले. आरोपी आल्याचे पाहताच फिर्यादी शिवानंद आणि त्याचे इतर साथीदार पळून गेले. मात्र त्यांच्या हाताला प्रेम लिंगदाळे हा तरूण लागला. आरोपींनी त्यांच्यावर कोयते व पालघनने वार केले. याबाबतची माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या प्रेम यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या