व्याजाने घेतलेले पैसे न दिल्यामुळे कपडे काढून तरुणाला मारहाण, व्हिडीओही बनवला

व्याजाने घेतलेल्या कर्जाची रक्कम न दिल्यामुळे तरूणाला  कपडे काढून  बेल्टने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील विमाननगरमध्ये घडला आहे. मारहाणीचा व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.

अविनाश कांबळे (रा. टिंगरे नगर) आणि दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास शहाजी कांबळे (वय 36, रा. उत्तेश्वर नगर, लोहगाव) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास आणि आरोपी अविनाश हे ओळखीचे आहेत. विकास यांनी अविनाश याच्याकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. काही दिवसांनी  अविनाश विकासला कर्ज व व्याजाची रक्कम मागत होता. मात्र त्यांनी थांबण्यास सांगितले होते. त्यामुळे अविनाश हे विकास काम करत असलेल्या ठिकाणी गेला. त्याठिकाणी त्यांना शिवीगाळ करून जबरदस्तीने गाडीवर बसवून कळसगांव येथील एका टाऊनशीप येथे घेऊन गेला.

त्यानंतर त्यांनी विकासच्या अंगावरील सर्व कपडे काढण्यास सांगितले. कपडे काढल्यानंतर आरोपींनी त्यांना बेल्टने जबर मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ तयार केला. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर विकासने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या