उत्सवाचा आनंद घ्यायचाच! पण…

सध्या सर्वत्र गरब्याची धूम सुरू आहे. तरुणाई गरब्याच्या ठेक्यावर बेधुंद होऊन ताल धरतेय, पण अलीकडे या उत्सवाचे स्वरूप बदलत चाललंय असंच दिसतं. मजा, मस्ती, धमाल हे नवरात्रात करायलाच हवं, पण त्याबरोबरच काही घटनांनी किंवा तरुणाईच्या बेभान वागण्याने या उत्सवाला वेगळंच स्वरूप येतं. यातून मग पालक आपल्या तरुण मुलामुलींना दांडियाला पाठवायला नाखूश असतात. काय म्हणतेय याबाबत तरुणाई…  

उत्सवाचे स्वरूप बदलले आहे

इतर कोणत्याही सणापेक्षा नवरात्र हा सण जास्त उत्साह निर्माण करतो. या उत्सवाची आम्ही आतुरतेने वाट बघतो. कारण वर्षातून एकदाच येणार्‍या या उत्सवामुळे मनसोक्त नाचायला मिळतं. मात्र अलीकडे या उत्सवाचं स्वरूप पालटलंय. गरबा खेळण्याच्या निमित्ताने तरुण घरातून बाहेर निघतात, रात्ररात्र बाहेर राहतात. गरब्यानंतर पार्टी करणे किंवा रात्रभर मित्रांसोबत बाहेर फिरणं याचं वेड आजकालच्या तरुण पिढीला लागलं आहे. काहींना इतरवेळी घरच्यांकडून रात्री बाहेर जाण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे ते नवरात्रीची वाट बघतात. गरबा आहे सांगून रात्री बाहेर पडतात. मात्र ही तरुण पिढी घरच्यांना फसवून रात्रभर पार्टी करत राहाते. त्यातून काही वेळा रात्री वादविवाद होतात. त्याचा त्रास समाजालाही होतो. त्यामुळे मला वाटतं तरुण पिढीने योग्य त्या वेळी योग्य ती गोष्ट करून सामाजिक आणि घरच्या परिस्थितीची जाण ठेवावी. – मानसी कारकर, कीर्ती कॉलेज

तरुणाई भरकटत आहे

नवरात्रोत्सवाच्या या नऊ दिवसांत आम्हा तरुणांचा कल असतो तो उडत्या चालीच्या गाण्यांवर गरबा खेळण्याकडे… पण संस्कृती जपण्यासाठी खेळल्या जाणार्‍या या नृत्याविष्काराला सध्या वेगळंच वळण लागतंय असं मलाही वाटतंय. सणाचं पावित्र्य राखण्याऐवजी मद्यपान करून गरबा खेळणं किंवा विनाकारण मुलींची छेड काढणे अशा गोष्टी करून आपल्याच सणांची विटंबना होतेय. या वाढत्या गैरप्रकारांमुळे गरब्यासारख्या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण नृत्यावरही एक दिवस बंदी येईल की काय अशी शंका येऊ लागली आहे. मला वाटतं आपली संस्कृती जपणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्यामुळे नवनवीन उपक्रमांमध्ये बदल घडवणे ही आता काळाची गरज बनली आहे. – ऋतुजा प्रभुपरब, साठय़े कॉलेज

उत्सव हा उत्सवासारखाच होऊ दे

नवरात्रीचा सण म्हणजे गरबा आलाच… घरच्यांची परवानगी घेऊन ही तरुणाई गरबा खेळण्यासाठी रात्रभर बाहेर जातात. त्यातले काहीजण गरबा खेळण्याऐवजी रात्रभर धमाल करण्यासाठी पबमध्ये जातात किंवा काहीजण बेकायदेशीर नशा करतात. त्यात नशेमुळे नाहक वादसुद्धा उद्भवतात. म्हणून मला वाटतं आपला उत्सव हा उत्सवासारखाच राहू दे. मजा, मस्ती, धमाल करायलाच हवी, पण त्या त्या उत्सवाचे भान राखायला हवे. जेणेकरून सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आजची तरुणाई सजग आहे हे खरे, पण त्याबरोबरच तिने सतर्क असणंही तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक शांततेचे पालन करावे आणि घरच्यांनी दिलेल्या परवानगीचा योग्य वापर करावा. – ओमकार सुर्वे, एन.एस.एम. कॉलेज

आपली प्रतिक्रिया द्या