प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने तरुण घाबरला; सीमा पार करून पोहचला पाकिस्तानात

राजस्थानातील 20 वर्षांचा तरुण अडीच महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यात आल्यानंतर चक्रावणारी माहिती उघड झाली आहे. या तरुणाचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांची माहिती उघड होण्याच्या भीतीने बाडमेरमधील गेमराम हा 20 वर्षांचा तरुण सीमा पार करून थेट पाकिस्तानात पोहचल्याची माहिती मिळाली.

गेमरामचे शेजारी राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. तो 5 नोव्हेंबरला तिला भेटायला गेला होता. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी त्या दोघांना एकत्र बघितले. त्यानंतर गेमराम तिथून निघून गेला. मुलीच्या घरच्यांनी आपल्याला तिच्यासोबत बघितले आहे. ते याची गावाला माहिती देतील. गावावाले आपली धुलाई करतील आणि आपली बदनामी होईल, अशी भीती तरुणाला वाटत होती. त्यामुळे या भीतीने त्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला.

गाव सोडून कोठे जायचे, असा प्रश्न त्याला पडला. अखेर त्याने सीमा पार करून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. 5 नोव्हेंबरच्या रात्री तो सीमेजवळ पोहचला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची नजर चुकवत त्याने तारांचे कुंपण पार केले. 6 नोव्हेंबरला त्याला पाकिस्तानी रेंजर्सने पकडले आणि तुरुंगात डांबले.

गेमराम बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत होते. त्यांनी पोलीस ठाण्यात गेमराम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तसेच तो पाकिस्तानात गेल्याची शक्यता वर्तवली. तपासादरम्यान गेमराम तारेचे कुंपण पार करून पाकिस्तानात गेल्याची माहिती मिळाली. त्याच्या कटुंबीयांनी नेत्यांशी संपर्क साधून त्याला परत आणण्याची विनंती केली.

या प्रकरणी बीएसएफला पत्र पाठवण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले. हिंदुस्थान आणि पाकिस्तानात होणाऱ्या फ्लॅग बैठकीदरम्यान अटक केलेल्या दोन्ही देशांतील नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येते. माजी खासदार मानवेंद्र सिंह यांनाही कटुंबीयांनी गेमरामला परत आणण्याची विनंती केली. त्यांनी याबाबत पाकिस्तानला पत्र लिहिले आहे.

गेमराम तारांचे कुंपण पार करून पाकिस्तानात पोहचल्याची माहिती पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. तो सीमापार कसा आणि का आला, याबाबत त्याची चौकशी सुरू असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाचे जवान सीमेवर तैनात असताना तसेच तारेचे कुंपण असताना गेमराम सीमापार कसा गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या