पेट्रोलियम जेलीचा भलताच प्रयोग तरुणाच्या अंगलट, हातांची अशी झालीये अवस्था

पेट्रोलियम जेली हा थंडीत अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे. थंडीत कोरड्या पडलेल्या त्वचेवरील भेगांमध्ये स्निग्धता आणून ती पूर्ववत करण्यासाठी या जेलीचा उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त वंगण म्हणूनही ही जेली वापरली जाते. पण, या जेलीचा भलताच प्रयोग एका तरुणाच्या अंगलट आला आहे.

या तरुणाचं नाव किरील टेरेशीन (24) असून तो रशियाचा नागरिक आहे. किरीलला शरीरसौष्ठवाची खूप हौस आहे. त्याला शरीर कमावून सुपरमॅनसारखं व्हायची प्रचंड इच्छा होती. त्यासाठी गेली चार वर्षं तो एक भयंकर प्रकार करत होता.

शरीर फुगीर दिसावं, विशेषतः दंड बळकट आणि मोठे दिसावेत म्हणून त्याने चार वर्षांपासून एक अघोरी प्रकार करायला सुरुवात केली. हा प्रकार म्हणजे पेट्रोलियम जेलीचं इंजेक्शन घेणं. गेली चार वर्षं तो दंडात पेट्रोलियम जेलीचं इंजेक्शन घेत होता. त्याचे दंड 24 इंचाचे झाले पण, त्याला सतत वेदना जाणवू लागली.

kiril-biceps

अंगात ताप राहू लागला. हे शरीर कमवून त्याचा काहीच फायदा किरीलला होत नव्हता. अखेर त्याच्या बायकोला या प्रकाराची कल्पना आली आणि तिनेच त्याला वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि त्याच्या हातातून सिनथॉल तेल आणि मृत पेशी बाहेर काढल्या.

जर त्याची वेळीच शस्त्रक्रिया झाली नसती, तर त्याचा जीवही जाऊ शकला असता, असं त्याचा सर्जन दिमित्री मेल्नीकोव याचं म्हणणं आहे. हाच प्रयोग अनेक लोकं शरीराचे अवयव फुगीर दिसावेत म्हणून करतात. पण, हे अत्यंत जीवघेणं आहे आणि याचा प्रयोग कुणीही करू नये, असा सल्लाही दिमित्रीने दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या