
आव्हान स्वीकारायलाही हिंमत लागते. सध्याचे मुख्यमंत्री आपण हिंमतबाज असल्याचा छातीठोक दावा करतात. त्यामुळे मी त्यांना अनेक आव्हाने दिली. परंतु, आव्हान दिले की, या मुख्यमंत्र्यांची वाचा बसते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते राज्यपाल अभिभाषण करणार? महाराष्ट्रद्वेषी! धमक असेल तर महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपालांना बदलून दाखवा, असे खुले आव्हान शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. शिवसंवाद यात्रेनिमित्ताने जालना जिह्यात बदनापूर, रामनगर तसेच घनसावंगी आणि बीड जिह्यात गेवराई येथे आदित्य ठाकरे यांनी शेतकरी व महिलांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा नाशिक जिह्यापासून सुरू झाला. नाशिकहून ही यात्रा संभाजीनगरात आली. त्यानंतर आज बुधवारी जालना जिह्यात हा झंझावात पोहोचला. सोमठाणा, रामनगर, मंगू जळगाव तसेच गेवराई येथे यात्रेनिमित्ताने आदित्य ठाकरे यांनी शेतकरी, महिलांशी थेट संवाद साधला.
शेती, उद्योगांचे वाटोळे झाले
शेतमालाला हमीभाव नाही, कोणत्याही मदतीची अपेक्षा या गद्दार सरकारकडून करणे म्हणजे कपाळमोक्ष करून घेण्यासारखेच आहे. उद्योगाचीही या सरकारने वाट लावली. गुजरातेत सरबराई केली म्हणून सगळे उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. वेदांता गेला, बल्क ड्रग हबही गेला, टाटा एअरबस प्रकल्पही गेला. मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री दावोसला गेले. या दौऱ्यावर 40 कोटी रुपये खर्च करण्यात आला, पण हाती काय आले तर भोपळा! दावोस दौऱ्याची पोलखोल करताच मुख्यमंत्र्यांची वाचा बसली. मुंबईतील रस्त्यांचा घोटाळा बाहेर काढला, मुख्यमंत्री गप्प. माझे खुले आव्हान आहे, जिथे म्हणाल तिथे चर्चा करू. पण महाशक्तीने या गद्दारांना गुलाम बनवले आहे, असा जबरदस्त टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
माझ्यासोबत लढणार का?
गद्दारांच्या विरोधात सुरू केलेली ही लढाई मोठी आहे. मुळात ही लढाई देशातील लोकशाही वाचविण्यासाठी आहे. या लढाईत तुम्ही माझ्यासोबत आहात का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करताच उपस्थितांनी हात वर करून, वज्रमूठ आवळून हुंकार भरला. गेले ते गद्दारच होते, आता वाजतोय तो शिवसेनेचा खणखणीत आवाज! यांना महाराष्ट्राचे तुकडे पाडायचेत. पैशांची वारेमाप उधळपट्टी करायचीय, पण मी हे होऊ देणार नाही. शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही, असा जोरदार इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.
मंत्रिमंडळाला महिलांचे वावडे
आम्ही क्रांती केली, मॅच खेळली, दहीहंडीचे थर लावले अशा गावगप्पा मारणाऱ्या मिंधे सरकारला महिलांचे मात्र वावडे आहे. यांच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थानच नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते लक्ष्मण वडले, खासदार संजय जाधव, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर उपस्थित होते.
आमचे हिंदुत्व सच्चे
आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, शिवसेनेचे हिंदुत्व सच्चे आणि स्पष्ट आहे. हृदयात राम, हाताला काम, सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाणारे आमचे हिंदुत्व. शिवसेनाप्रमुखांचे रक्त हे सर्वांना पुढे घेऊन जाणारे आहे. अडीच वर्षांच्या काळात उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास होता, त्यांच्यावर राज्यातील महिलांचा विश्वास होता, त्यांच्यावर महाराष्ट्रातील तमाम सामान्य नागरिकांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांची गणना टॉप तीन मुख्यमंत्र्यांमध्ये केली जायची. आताचे लोटांगण घालणारे मुख्यमंत्री कितव्या नंबरला आहेत, हे जरा विचारा, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला.
गद्दारीला फार आयुष्य नसते
आपल्या भाषणात सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांनी राज्यातील मिंधे सरकारवर तुफानी हल्ला चढवला. घटनेची मोडतोड करून आलेले हे सरकार ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल, त्यादिवशी पडणार म्हणजे पडणारच! असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. गद्दारीला फार आयुष्य नसते, असे सांगतानाच त्यांनी सरकार गेले म्हणजे हे गद्दारही नामशेष होणार. देशात सत्यमेव जयते असे बोलले जाते. ‘सत्तामेव जयते’ असे ज्यांचे ब्रीद आहे, त्यांना जनताच आता त्यांची जागा दाखवून देईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
गद्दारांना खोके मिळाले. त्यांनी स्वतःचा स्वार्थ पाहिला, पण राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगारांचे आज काय हाल आहेत. त्यांचा आवाज ऐकणारे या सरकारमध्ये कुणी आहे का? मुळात राज्यातील गोरगरिबांचा आवाज या ठार बहिऱ्या सरकारला ऐकू तरी येतोय का? यांना मिळाले खोके आणि शेतकऱ्यांना अंगठा दाखवून हे पसार झाले. राज्यात सरकारचे अस्तित्व आहे की नाही, अशी शंका यावी एवढी भयाण परिस्थिती आहे. अतिवृष्टीचे अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही. नुकसानीचे पंचनामे झाले, पण त्याकडे बघायला कुणी नाही. राज्याला कृषिमंत्री आहेत का, असा प्रश्न पडतो. आम्ही सरकारात होतो, तेव्हा पहिले काम शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्त केले होते. जे केले ते खणखणीत वाजवून सांगितले. पण यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी आम्ही कबड्डी खेळली, क्रिकेटचा मॅच खेळला, दहीहंडीचे थर लावले असे जुनेच तुणतुणे वाजवतात, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
मिंध्यांनी खुर्चीसाठी गद्दारी केली,आता रिकामी खुर्च्या बघण्याची नामुष्की ओढवली
वरळीत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचा फियास्को झाला. रिकाम्या खुर्च्यांपुढे त्यांना भाषण ठोकावे लागले. त्यावरून शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज जोरदार टोले हाणले. घटनाबाह्य मुख्यमंत्री काल माझ्या मतदारसंघात आले होते. सभेला कोळी बांधव आल्याचे दाखवण्यासाठी कोळी टोप्या घालून लोकांना बसवण्यात आले. त्यातल्या एकाला पत्रकाराने प्रश्न विचारला तर तो हिंदीत उत्तर देऊ लागला. हा काय प्रकार आहे. वरळीतल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला अलाहाबादचे कोळी आणून बसवले होते का? असा तिरकस सवाल आदित्य ठाकरे यांनी मिध्यांना केला. महाराष्ट्र सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. अशा वेळी जनता आपल्यासोबत आहे. त्यामुळेच आपल्या सभांना गर्दी आणि त्यांच्या सभांना खुर्च्यांची गर्दी असे चित्र सर्वत्र दिसत आहे. खुर्च्यांसाठी त्यांनी गद्दारी केली आणि आता त्यांना समोर मोकळय़ा खुर्च्याच पाहाव्या लागत आहेत, असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
सगळीकडे डबल इंजिनचा डंका वाजवतात. डबल इंजिनचे सरकार म्हणून विकास झाला, असा राणा भीमदेवी थाटात दावाही करतात. मग महाराष्ट्रातच एक इंजिन का फेल झाले? सरकार आल्यापासून नुसती अवकळा आहे. कुठे गेला विकास?