मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधील अनेक भाग सीसीटीव्हीच्या कव्हरेजमध्ये येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या भागात कॅमेरे बसविण्याची मागणी युवासेनेने विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.
काही वर्षांपूर्वी एका विद्यार्थिनीवर झालेल्या अतिप्रसंगानंतर कालिना कॅम्पसमधील काही ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले; परंतु अनेक क्षेत्र आजही कव्हरेजमध्ये नसल्यामुळे बदलापूरसारख्या मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी सरकारने कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अथवा विद्यापीठ निधीतून यंत्रणा उभी करण्याचे आदेश द्यावेत आणि संपूर्ण परिसर कव्हरेज क्षेत्रात आणावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
तसेच युवासेनेच्या वतीने कालिनाचा परिसर सीसीटीव्ही कव्हरेज क्षेत्रात आणावा याबाबतचे निवेदन प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनाही दिले आहेत.