शिक्षणमंत्री तावडेंच्या काळात कॉलेज मान्यतेचे नियम धाब्यावर

773

तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात कॉलेज मान्यतेचे नियम धाब्यावर बसवत खासगी कोचिंग क्लासचालकांना ज्युनियर कॉलेज सुरू करण्यास परवानगी दिल्याची तक्रार युवासेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. रहिवासी अथवा कमर्शिअल इमारतींमध्ये दोन-तीन खोल्यांमध्ये ही कॉलेज सुरू असून तेथे प्रयोगशाळा आणि मैदानेदेखील नाहीत. तसेच एचएससी बोर्डाची मान्यताही नसल्याने बोर्डाकडून या कॉलेजमध्ये शिकणाऱया हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जदेखील भरता आलेला नाही.

शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये कोणतीही कायदेशीर बाब न पाळता तसेच रितसर प्रक्रिया पूर्ण न करता राव सायन्स ज्युनियर कॉलेज या संस्थेला मुंबईत पाच ठिकाणी अकरावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी शालेय शिक्षण विभागाने दिली. यापैकी एकाही ठिकाणी ज्युनियर कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. तरीदेखील अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत राव ज्युनियर कॉलेजचा समावेश करण्यात आला. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये अकरावीत प्रवेश घेतला.

यंदा म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये यापैकी काही विद्यार्थी बारावीत शिकत असून या कॉलेजला एचएससी बोर्डाचा इंडेक्स क्रमांकच न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षाअर्ज बोर्डाने स्वीकारलेले नाहीत.

मुंबईत आणखी बेकायदेशीर कॉलेज
राव कॉलेजप्रमाणेच ऍलन ज्युनियर कॉलेज, लक्ष्य ज्युनियर कॉलेजनेही याच प्रकारे बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. विशेष म्हणजे प्रवेश देतेवेळी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फीदेखील घेण्यात आली आहे. हे प्रकरण युवासेनेने उघडकीस आणले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत विद्यार्थी-पालकांची फसवणूक करणाऱया या कॉलेजचालकांची उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, शीतल देवरूखकर-शेठ यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या