दुष्काळी परिस्थिती पाहून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, युवासेनेची मागणी

33

सामना प्रतिनिधी । लातूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नापास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी म्हणून जुलै मध्ये परीक्षा ठेवली. परंतु ऑक्टोबर मध्ये होणारी परीक्षा रद्द केली आहे. ऑक्टोबरची परीक्षा पूर्ववत सुरू करण्यात यावी. पूर्वीप्रमाणे अंतर्गत गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून ते धनादेशाद्वारे परत करावेत, अशी मागणी युवासेनेच्या वतीने लातूर विभागीय शिक्षण मंडळाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बोर्डाच्या वतीने नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सोय म्हणून जुलै मध्ये परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र ही परीक्षा घेत असताना बोर्डाने ऑक्टोबर मध्ये होणारी परीक्षा रद्द केली आहे. जुलैच्या परिक्षेत विद्यार्थी नापास झाला तर पुन्हा मार्चचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. विद्याथ्र्याची सोय म्हणून ऑक्टोबरच्या परिक्षेचा पर्याय उपलब्ध रहावा यासाठी ऑक्टोबरची परीक्षा पुन्हा सुरू करण्यात यावी. विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी परीक्षा शुल्क किती आहे याची घोषणा करण्यात यावी. भाषा विषयाचे अंतर्गत गुण पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना देण्यात यावे. खेळाच्या गुणांची प्रक्रिया लवकर पूर्ण करावीत ज्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल. तसेच सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदरील निवेदन देताना युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी अ‍ॅड. श्रीनिवास मातोळकर, डॉ. नितीन शिंदे, विशाल शिंदे, विकास तोगरे, संतोष माने, अ‍ॅड. रवि पिचारे, सौरभ बुरबुरे, अभिजीत गायकवाड, आकाश मसाणे यांचा सहभाग होता.

आपली प्रतिक्रिया द्या