मुंबईचा लखलखाट कमी होऊ देणार नाही- आदित्य ठाकरे

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना नेहमीच वेगळे काहीतरी करत आली आहे. जुहू चौपाटीवर जी विद्युत रोषणाई केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद असून मुंबईला आतून-बाहेरून कुठूनही बघितले तरीही मुंबईतला लखलखाट डोळ्यांचे पारणे फेडेल. अशी ही मुंबईतली रोषणाई कमी होऊ देणार नाही, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जुहूवरील विद्युत रोषणाईचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

dsc_4733_crop_700x450

शिवसेनेच्या जिद्दीला मुंबईकरांनी नेहमीच साथ आणि आशीर्वाद दिले आहेत. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि महापालिका अधिकाऱयांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच जुहू चौपाटी उजळून निघाली. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, भाजप आमदार अमित साटम, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर, शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.

गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

चौपाटय़ांवर मुंबईकर आणि बाहेरगावाहून पर्यटक येतात. ते चौपाटय़ांवर आणि समुद्रात कचरा फेकतात. त्यामध्ये प्लॅस्टिकचा मोठय़ा प्रमाणात समावेश असतो. हाच कचरा पावसाळ्यात समुद्र किनाऱयावर फेकतो. परंतु, गुढी पाडव्यापासून मुंबईत पूर्णपणे प्लॅस्टिकबंदी करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

dsc_4860_crop_700x450