पावसाळा तोंडावर आल्यामुळे पालिकेच्या जी/दक्षिण वरळी विभागात पावसाळापूर्व कामे परिणामकारकरीत्या करून पावसाळय़ात कुठेही पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश पालिका प्रशासनाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दिले.
आदित्य ठाकरे यांनी आज जी/दक्षिण विभाग कार्यालयात भेट देत वॉर्डमधील पावसाळी कामे आणि सुरू असलेल्या विकासकामांचाही आढावा घेतला. यावेळी सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्याकडून सर्व कामांची माहिती घेत आवश्यक सूचनाही दिल्या. मुसळधार पावसात पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या, पंपिंग स्टेशन, वाहतूक व्यवस्थापन आणि स्थानिक रहिवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी आमदार सुनील शिंदे, उपनेते आमदार सचिन अहीर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, हेमांगी वरळीकर यांच्यासह विभागातील शिवसैनिक उपस्थित होते.