युवासेनेचं हिंगोलीत वाहतूक पोलिसांविरोधात आंदोलन

27

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोलीत वाहतूक विभागाच्या विरोधात गुरुवारी युवासेनेच्या जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे यांच्या नेतृत्वात युवा सैनिक रस्त्यावर उतरले. वाहतूक पोलिसांकडू वाहन चालकांना अडवून नाहक त्रास दिला जात असल्याचा तसेच अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोपी नागरिकांनी केला आहे. हिंगोली शहरातील इंदिरा पुतळ्याजवळ वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरच युवासैनिकांनी रस्त्यावर जोरदार ठिय्या आंदोलन केलं.

हिंगोली शहर वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेच्या वादग्रस्त व गैरकारभाराला सर्वसामान्य नागरिक व वाहनधारक वैतागले होते. शहरात वाहतूक पोलिसांकडून टोळीने वसुली अभियान राबविले जाते. दुचाकी, चारचाकी वाहने, रिक्षा, छोटी मालवाहू वाहने अडवून विनाकारण अपमानास्पद वागणूक देऊन सक्तीने दंडवसुली करण्याचे प्रकार होत आहेत. तसेच वाहनांवर शिवसेना, युवासेना असे स्टिकर असल्यास वाहने अडवल्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे यांच्याकडे युवासैनिक व नागरिकांनी केल्या होत्या.

युवासेनेनं यावेळी वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केले. ‘पोलिसांनी नियमानुसार कारवाई करावी. मात्र, आकस ठेवून वाहने अडवणार असाल तर गाठ युवासेना व शिवसेनेशी आहे, अशा सज्जड शब्दात दिलीप घुगे यांनी दम भरला. युवासेनेच्या आंदोलनाला वाहनधारक व नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मैराळ यांनी आंदोलनस्थळी येऊन दिलीप घुगे यांच्याशी चर्चा केली. यापुढे नियमानुसार वाहतूक पोलीस काम करतील आणि विनाकारण वाहनधारकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन मैराळ यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या