
19 सप्टेंबर 2007, बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी टीम इंडियाचा तत्कालीन क्रिकेटपटू युवाराज सिंगने इतिहास घडवला होता. दक्षिण आफ्रिकेत खेळताना टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात 6 चेंडूवर 6 षटकार खेचले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हर्शल गिब्ज यानेही एकाच षटकात 6 षटकार खेचून यादीत दुसरे स्थान पटकावले.
टीम इंडिया 18 व्या षटकाला सामोरे जात होती. फ्लिंटॉफ गोलंदाजी करत होता. युवराज आणि फ्लिंटॉफमध्ये बाचाबाची झाली. फ्लिंटॉफने युवराजकडे पाहून काही हातवारे केले होते. त्यामुळे युवराज संतापला होता. त्यानंतर 19 वं षटक टाकतांना स्टुअर्ट ब्रॉडला त्याचा फटका बसला. कारण युवाराजने फ्लिंटॉफवरच्या रागाचे उत्तर आपल्या खेळीतून दिलं. सहा चेंडूवर सहा षटकार खेचत त्याने विक्रम केला. दुसऱ्या बाजूला तत्कालीन कर्णधार धोनी युवीचा खेळ शांतपणे पाहात आनंद घेत होता. टीम इंडियाने या सामन्यात 218 धावा केल्या होत्या. त्यानंतर खेळणाऱ्या इंग्लंडचा 18 धावांचा पराभव झाला. तसेच टीम इंडियाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला.
या खेळातच युवराज सिंगने केवळ 12 चेंडूत अर्धशतक ठोकले. यामध्ये 7 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. 16 चेंडूत 58 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. हा रेकॉर्ड अद्यापही कायम आहे.