आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी सर्वच संघांनी आता मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स संघाने (एलएसजी) टीम इंडियाचा माजी प्रमुख वेगवान गोलंदाज झहीर खानला आपल्या संघाचे मेंटॉर म्हणून नियुक्त केले आहे. एलएसजी फ्रेंचायझींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून माहिती दिली आहे. झहीर खानचे दीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन झाले आहे. व्यावसायिक क्रिकेटला अलविदा केल्यानंतर एकेकाळी मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालकपद भूषवणारा झहीर आता आगामी मोसमात लखनौ सुपर जायंट्स संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडणार आहे. लखनौ संघाचा शेवटचा आयपीएल हंगाम अपेक्षेप्रमाणे राहिला नव्हता. त्यामुळे संघात मोठे बदल होणार हे अगोदरच स्पष्ट होते, ज्यावर झहीर खानच्या नियुक्तीने शिक्कामोर्तब झाला.