हिंदुस्थानने झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणीच केलेली नाही! मलेशियन पंतप्रधानांचा दावा

898


हिंदुस्थानने वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाची अधिकृत मागणीच मलेशियाकडे केली नसल्याचा दावा मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी केला आहे. त्यामुळे नाईकला हिंदुस्थानकडे सोपविण्याचा प्रश्न सध्यातरी येत नाहीय असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असताना मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांची भेट घेतली होती. नरेंद्र मोदी आणि महाथिर मोहम्मद यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली होती. यावेळी मोदींनी हिंदुस्थानातून फरार होत मलेशियात आश्रय घेतलेल्या झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावर चर्चा केली असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली होती. मात्र महाथिर मोहम्मद यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमाशी बोलताना महाथीर म्हणाले की, ‘अनेक देशांना झाकीर नाईक आपल्याकडे नको आहे. मी नरेंद्र मोदींना भेटलो, त्यांनी माझ्याकडे त्याचं प्रत्यार्पण करण्याची कोणतीही मागणी केलेली नाही. ही व्यक्ती हिंदुस्थानसाठीही त्रासदायक ठरु शकते याची मला जाण आहे. मलेशियामधील हिंदूंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या झाकीर नाईकला कुठे पाठवता येईल यासंबंधी आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही तशा जागेचा शोध घेत आहोत. पण सध्याच्या घडीला कोणताही देश त्याला स्वीकारण्यास तयार नाही,’ असंही त्यांनी स्पष्ट केले.

zakir-naik

महाथिर मोहम्मद यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुस्थानचा दावा फोल ठरला आहे. नरेंद्र मोदी आणि महथिर मोहम्मद यांच्या बैठकीसंबंधी विचारलं असता विजय गोखले यांनी सांगितलं होतं की, ‘दोन्ही देशातील अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहतील असा निर्णय झाला आहे.’

कोण आहे झाकीर नाईक
झाकीर नाईक हा फरार असून त्याच्याविरोधात दहशतवदाशी संबंधित गंभीर आरोप आहेत. 1 जुलै 2016 रोजी ढाक्यात एका कॅफेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईकचे नाव समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( एनआयए) त्याच्यावर आरोप निश्चित केले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या त्या हल्ल्यात तब्बल 20 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. झाकीर वादग्रस्त ‘पीस टीव्ही’चा संस्थापक असून 2017 पासून तो मलेशियात वास्तव्य करत आहे. सध्याच्या मलेशियन सरकारने झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, मात्र त्याच्या सार्वजनिक भाषणांवर बंदी आणली आहे. त्याच्या सर्व हालचालींवर मलेशियन सरकारची नजर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या