पैगंबरांना विरोध करणाऱ्या हिंदुस्थानींना मुस्लीम देशांनी अटक करावी, झाकिर नाईकचे फुत्कार

धार्मिक तेढ पसरवण्याच्या आरोपानंतर हिंदुस्थानातून फरार होऊन मलेशियात लपलेल्या झाकिर नाईक याने पुन्हा एकदा विषारी फुत्कार सोडले आहेत.

झाकिर नाईक याने मलेशियात हिंदुस्थानींविरोधात आपले विषारी विचार प्रकट केले आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात बोलणाऱ्या आणि त्यांची निंदा करणाऱ्या गैर मुस्लीम हिंदुस्थानींना मुस्लीम देशांनी अटक करावी असं म्हटलं आहे.

मलेशियात लपून बसलेल्या झाकिर नाईक याने सौदी अरेबिया, इंडोनेशियासह अनेक मुस्लीम देशांना आवाहन केलं आहे. त्या आवाहनानुसार, या देशांनी पैगंबरांना विरोध करणाऱ्या हिंदुस्थानी लोकांच्या नावाची एक यादी बनवावी. जेणेकरून ते जेव्हा मुस्लीम देशांमध्ये प्रवास करत असतील तेव्हा त्यांना अटक करता येईल. ते पैगंबरांबद्दल जे जे बोलतील, त्याचीही एक स्वतंत्र यादी बनवण्यात यावी, असंही नाईक याने आपल्या आवहनात म्हटलं आहे.

जसे हे लोक येतील, तसं यांना अटक करा
तो पुढे म्हणाला की, जेव्हा हे लोक आखाती देशांमध्ये येतील, मग ते कुवैत, सौदी अरेबिया किंवा इंडोनेशिया असो, त्यांची कसून चौकशी केली जावी. चौकशीदरम्यान त्यांनी पैगंबराविरुद्ध किंवा इस्लामविरुद्ध काही अपमानजनक वक्तव्य केलेलं असल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, असं नाईक म्हणाला आहे.

हिंदुस्थानातून पळून गेलेल्या झाकीरला मलेशियात अल्पसंख्यांक हिंदू आणि चिनी लोकांच्या भावना भडकावण्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे.

यापूर्वीही झाकीर नाईक याने मलेशियातील धार्मिक भावना भडकवण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यावेळी मलेशियात हिंदूंना हिंदुस्थानातील मुस्लिमांहून 100 टक्के जास्त अधिकार मिळाले आहेत असे प्रक्षोभक विधान झाकीरने केले होते. त्यावेळी देशात कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. झाकिर नाईक हाही नाही, असे सांगत मलेशियाचे गृहमंत्री मुहीद्दीन यासिन यांनी इस्लामिक धर्मप्रचारक झाकिर हुसेन याला ठणकावले होते.

मलेशिया सरकारने झाकिरला कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास निर्बंध घातला आहे. तो जर पुन्हा एखाद्या बेकायदेशीर कामात आढळून आला तर त्याचा निवासी दर्जा काढून घेण्यात येईल असेही सरकारने त्याला बजावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या