जीवनदायी जिवंत झरे

170

भरत जोशी, वन्य जीव अभ्यासक

प्रत्येक  माणसाला जशी रोटी, कपडा आणि मकानची गरज असते त्याहूनही त्याला कैक अधिक गरज असते ती पाण्याची. कारण ‘पाणी हे जीवन’ आहे. निसर्गसाखळीतील एखादा ‘वन्य जीव’ बरेच दिवस  खाद्य मिळाले नाही तरी तो जगू शकतो, परंतु पाणी नसेल तर त्या वन्यप्राण्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. प्रत्येक प्राणिमात्राच्या शरीरात अन्न म्हणजे पाणी हे ७५ टक्के असणे गरजेचे असते.

पण हे जंगलातील, कडेकपारीतील, वाळवंटी प्रदेशातील, कातळातील पक्षी, प्राणी, कीटक, जिवाणू, सरपटणारे प्राणी उदाहरणार्थ सापसुरळी, घोरपड, सुसर, मगर, सर्प यांना कसे शक्य आहे. जंगलचा कायदा वेगळाच असतो. त्याच बरोबर प्रत्येक वन्य जीवाला जसे भक्ष्याच्या मागे लागून पाठलाग करून ‘भक्ष्य’ पकडायचे असते. तेवढय़ाच चलाखी, चपळाईने शत्रूपासून बचाव करत पळ काढावा लागतो. या सर्व धडपडीसाठी शरीरात हवी असते ऊर्जा, चपळता, चलाखी आणि ती प्राण्यांना मिळत असते पाण्यातून. म्हणून पाणी हे ‘जीवन’ आहे.

सातारा जिल्हय़ातील कास पठार हे १२३० मीटर उंचीवर असून कास पठाराच्या शेजारी एकूण ५ गावे मोडतात. ऐंक्यू, कुसुंबी, कासानी, अटाळी आणि पोटघर याचे वनक्षेत्र १८०० मीटर एवढे आहे. कास पठारावर आणि इतर पाच गावांत वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे  हे वन्य जीव पाण्याच्या शोधार्थ गावात मनुष्यवस्तीत मोठय़ा प्रमाणात येतात. त्यातूनच मानव आणि वन्य प्राणी संघर्षाला सुरुवात होते. या दुर्घटना टाळण्यासाठी आणि वन्य प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सातारा जिल्हय़ातील वन व्यवस्थापन समितीतर्फे ग्रामस्थांच्या सहभागातून मृतावस्थेत असलेले पाण्याचे स्रोत, झरे मोकळे करण्याचे काम निसर्गमित्र, वन कर्मचारी, ग्रामस्थ अहोरात्र करत आहेत. या सगळ्यांनी पालापाचोळा, दगड, माती यांमुळे बंद झालेले झरे मोकळे केल्यामुळे पाण्याचे झरे पुन्हा वाहू लागलेले आहेत. तसेच वनविभागाने कास पठरावर सिमेंटचे सात पाणवठे बांधले असून त्या सिमेंटच्या कृत्रिम पाणवठय़ाच्या टाक्यांमध्ये टँकरने पाणी भरले जाते.

त्याचप्रमाणे कास गावात आणि इतर जवळच्या ५ गावांत एकूण २० सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या (कृत्रिम पाणवठे) तयार करण्यात आले आहेत.यामुळे पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी यांना भरपूर पाणी मिळत असते. येथील बिबटे, तरस, रानडुक्कर, भेकर, सायाळ, खवले मांजर, तरस इत्यादी प्राणी तसेच इतर सरपटणारे प्राणी विविध प्रकारचे सरडे, पाली, बेडूक, नाग, मण्यार, घोणस, अजगर, धामणी, पाणसर्प इत्यादी विविध १९  प्रकारच्या प्रजातींना पाणी मुबलक मिळत आहे. यामुळे वन्यजीवांना नवसंजीवनी मिळाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या