रतन टाटा यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर, ‘झी’कडून बायोपिकची घोषणा

देशाचे दूरदर्शी उद्योजक आणि प्रेरणास्थान असलेल्या रतन टाटा यांच्या निधनाने देश शोकाकुल आहे. अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे रतन टाटा यांचे व्यक्तिमत्त्व होते. अखेरपर्यंत त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. रतन टाटा यांचे प्रेरणादायी आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहता येईल.

झी एंटरटेन्मेंट एंटरप्राइजेस लिमिटेडने रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करताना ही घोषणा केली. झी एंटरटेन्मेंटचे एमडी आणि सीईओ पुनित गोयंका यांनी रतन टाटा यांच्या बायोपिकचा प्रस्ताव ठेवला आहे. उद्योगमहर्षी टाटा यांनी जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांचे विचार अशा विविध गोष्टी तरुणांसमोर मांडल्या जाव्यात याकरिता या बायोपिकची घोषणा केली आहे.

झी एंटरटेन्मेंट एन्टरप्राइजेस लिमिटेड चेअरमन आर. गोपालन यांनी अशी माहिती दिली की, रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी झी स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा सिनेमा जागतिक स्तरावर सकारात्मक प्रभाव टाकेल, रतन टाटा यांच्या जीवनाद्वारे अनेक गोष्टी शिकायला मिळतील आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी लाखो लोक प्रेरित होतील, असा विश्वास आहे.

नफा सामाजिक कार्यासाठी वापरणार

टाटा सन्सकडून परवानगी मिळाल्यानंतरच हा प्रोजेक्ट सुरू होणार असल्याचे समजते. या सिनेमाच्या माध्यमातून मिळणारा नफा झी स्टुडिओकडून सामाजिक कार्यासाठी, गरजूंच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. बायोपिकसाठी वर्ल्ड इज वन न्यूज कंपनी झी स्टुडिओसोबत सहनिर्माता असेल, जेणेकरून चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचवता येईल.