“युवावार” ठरणार महाएपिसोड्सचा मान्सून धमाका

सामना ऑनलाईन । मुंबई

पाऊस कधी रिमझिम, कधी मुसळधार तर कधी अचानक धुंद बरसतो, ओला हळवा पाऊस अतिशय प्रेमाने तुम्हाला अलगदपणे कवेत घेतो. मुळात हा ऋतूच प्रेमात पाडणारा आहे. सुंदर निसर्गात मंत्रमुग्धपणे भिजल्यावर, गरमागरम चहा, कांदा भजी. सोबतीला एखादं रोमँटिक गाणं ही प्रत्येकाची अपेक्षा असते. आपल्या प्रेक्षकांचा मान्सूनचा हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या मालिकांच्या महाएपिसोड्सचा मान्सून धमाका घेऊन येत आहे .

झी युवावर येत्या ९ जुलैला महाएपिसोडचा “युवावार” साजरा होणार आहे. झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड ‘बवेश जानवलेकर’ यांनी महाएपिसोडच्या निमित्ताने सांगितले की “ पहिली भेट, पहिली डेट आणि पहिलं प्रपोज ही थीम घेऊन झी युवा प्रेक्षकांसाठी ‘अंजली’, ‘फुलपाखरू’आणि ‘लव्ह लग्न लोचा’ या तिन्ही मालिकांचे महाएपिसोड्सची पर्वणी घेऊन येत आहे. झी युवा नेहमीच प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट कार्यक्रम घेऊन येत असते. सध्या प्रेक्षक मान्सूनची मजा अनुभूवत असताना हा एक वेगळा प्रयोग आम्ही करत आहोत. प्रेक्षकांचं आमच्यावरील प्रेम वाढत राहो अशी आमची इच्छा आहे.“

डॉक्टरांच्या आयुष्यावर आधारित ‘अंजली’ या मालिकेत एका नवीन डॉक्टरची एंट्री होणार आहे. डॉक्टर असीम म्हणजेच पियुष रानडे हे एक नवीन पात्र मालिकेत दाखल होत आहे. डॉक्टर असीम आणि अंजली यांची एका कॅम्पच्या निमित्ताने पहिल्यांदाच भेट होणार असून असीमच्या येण्याने अंजलीच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलाची सुरुवात या महाएपिसोडमधून होणार आहे. हा महाएपिसोड रविवार ९ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता झी युवावर पहायला मिळेल.

टीनएज लव्हस्टोरी असलेल्या ‘फुलपाखरू’ या मालिकेत मानस आणि वैदेही यांच्यातला अबोला अखेर संपला असून चांगल्या मैत्रीला सुरुवात झाली आहे. या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का आणि कधी याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. गेल्या काही महिन्यांच्या मैत्रीनंतर मानस आणि वैदेही अखेर पहिल्यांदा डेटवर जाणार आहेत. इथे नेमकं काय घडेल? मानस आणि वैदेही आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करतील का? हे या महाएपिसोडमध्ये उलगडेल.हा महाएपिसोड रविवार ९ जुलै रोजी दुपारी १ आणि संध्याकाळी ८ वाजता झी युवावर पहायला मिळेल.

प्रेम, लग्न आणि त्यामुळे होणारे लोचे यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘लव्ह लग्न लोचा’ मालिकेत राघवच्या आयुष्यात बदल घडणार असून त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे. प्रेम म्हणजे टाईमपास असा समज असलेला राघव आता खऱ्या प्रेमात पडला असून काव्याला प्रपोज करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. एका खास क्षणी राघव त्याचं प्रेम काव्याकडे व्यक्त करणार आहे. हा महाएपिसोड रविवार ९ जुलै रोजी दुपारी २ आणि संध्याकाळी ९ वाजता झी युवावर पहायला मिळेल. झी युवाच्या पहिल्या पावसात हे खास मान्सून गिफ्ट मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्येही याबद्दल नक्कीच उत्सुकता असेल यात शंका नाही.

आपली प्रतिक्रिया द्या