भा* मे जा! म्हणत भाई जगतापांनी धक्काबुक्की केली! काँग्रेस आमदाराची सोनिया गांधींकडे लेखी तक्रार

राजस्थान आणि पंजाब सारख्या राज्यांमधील काँग्रेस नेत्यांमधला कलह हा पक्षासाठी तापदायक ठरला आहे. महाराष्ट्रामध्येही काँग्रेस नेत्यांमध्ये कलह निर्माण व्हायला लागला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुंबईत आलेले असताना काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये घडलेला प्रसंग हा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यातील एका काँग्रेस नेत्याने दुसऱ्याविरोधात थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. जगताप यांनी आपल्याला पहिले ‘गेट आउट’ म्हटले आणि नंतर अर्वाच्च भाषेत आपल्यासोबत बोलत धक्काबुक्की केली असं या काँग्रेस नेत्याने म्हटलं आहे.  हा प्रकार गंभीर असून पक्ष नेतृत्वाने जगताप यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी या नेत्याने केली आहे.

मुंबईमध्ये काँग्रेसने वाढत्या महागाईचा आणि बेरोजगारीचा निषेध करण्यासाठी एका मोर्चाचं आयोजन केलं होतं. मोर्चाला काँग्रेस सरचिटणीस के.सी.वेणूगोपालही हजर होते. दादरमधील हिंदू कॉलनीतील राजगृह (डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान) ते चैत्यभूमी असा हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चापूर्वी काँग्रेस नेते राजगृहात गेले होते. भाई जगताप यांनी आपले नाव आत जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत दिले नव्हते, तरीही आमदार असल्याने पोलीस मला आत जायला देत होते असे झिशान सिद्धीकी यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. मी आत येत असल्याचं पाहिल्यानंतर जगताप यांनी माझ्या दिशेने धाव घेत ‘एमएलए, विमेले जो भी सो सब बाहर, आऊट’ असं म्हणत हाकलून देण्याचा प्रयत्न केल्याचं सिद्दीकी यांनी म्हटलंय. यावर आक्षेप घेतला असता जगताप यांनी ‘तेरेको अच्छा नही लग रहा तो भा* मे जा’ असं म्हटलं. त्यांच्या या वाक्याने मला धक्का बसला असं सिद्दीकी यांनी पत्रात लिहिलं आहे.

राजगृहातून नेते बाहेर आल्यानंतर सिद्दीकी यांनी जगताप यांना गाठत, तुम्ही सगळ्यांसमोर माझ्याशी असं वागणं योग्य नव्हतं असं म्हटलं. यामुळे भाई जगताप यांना राग आला आणि त्यांनी मला ढकलून देत माझ्या समाजाबद्दल अपशब्द काढले असं झिशान यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. जर आमदारालाच अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य पक्षाचा कार्यकर्ता कसा सुरक्षित राहू शकेल असा प्रश्न झिशान यांनी विचारला आहे. भाई जगताप हे आपल्यासोबत सातत्याने दुजाभाव ठेवत असून त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई केली जावी अशी मागणी झिशान यांनी केली आहे.