झोमॅटो डिलेव्हरी बॉयच्या वेशभूषेत ड्रग्जची तस्करी, स्ट्रगलिंग मॉडल आणि उच्चभ्रू वस्तीत विक्री

कोणालाही संशय येऊ नये यासाठी झोमॅटो डिलेव्हरी बॉयची वेशभूषा करून तो ड्रग्जची तस्करी करायचा. स्ट्रगलिंग मॉडल तसेच अंधेरी लोखंडवाला परिसरातील उच्चभ्रु नशेबाजांना ड्रग्ज विकणाऱया तस्कराची बनवाबनवी मुंबई गुन्हे शाखा युनीट-9ने मोडीत काढली. त्या तस्कराला रंगेहात पकडून तब्बल 139 ग्रॅम एमडीचा साठा जप्त केला.

जोगेश्वरी पश्चिमेकडील लिंक रोडवर असलेल्या मेगा मॉल जवळ एक झोमॅटो डिलव्हरी बॉय ड्रग्जची डिलेव्हरी देण्यासाठी येणार असल्याची खबर युनीट-9चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदपुमार गोपाळे यांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळे यांनी पोलिस निरीक्षक संजीव गावडे व पथकासह मेगा मॉल परिसरात सापळा लावला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार एक मोटारसायकल तेथे येताच पथकाने त्या झोमॅटो बॉयच्या वेशभूषेत असलेल्या दुचाकीस्वारावर झडप घातली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 139 ग्रॅम एमडीचा साठा मिळाला. त्याला पकडून चौकशी केली असता त्याचे नाव उस्मान अन्वरअली शेख (40) असे असून तो स्ट्रगलिंग मॉडल्स तसेच लोखंडवालातील उच्चभ्रु नशेबाजांना ड्रग्ज विकत असल्याची कबूली दिली. तो ड्रग्ज कोणाकडून विकत घेतो तसेच तो कोणाकोणाला विकतो याचा पोलिस शोध घेत आहेत. त्याच्या मोबाईलमधून अनेक नशेबाजांची नावं समजण्यास पोलिसांना मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या