मुंबईतील उद्यान, मैदान, मनोरंजन मैदानाच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेने काढलेल्या निविदेत झोन आणि कार्ड स्तरावर निविदा काढल्या आहेत. अशा प्रकारे एकाच कामासाठी दोन पद्धतीने निविदा काढल्यामुळे कंत्राटदाराना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठीचा हा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
निविदा भरलेल्या आणि मिळवलेल्या कंपन्यांनी झोन आणि कॉर्ड स्तरावर दोन वेगवेगळ्या दरपत्रक भरले असून सिंडिकेट पद्धतीने ही कंत्राटे मिळवली आहेत. त्यामुळे यात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असून या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऍड. सागर देवरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबई महापालिकेने उद्यान, मैदान, मनोरंजन मैदानाच्या देखभालीसाठी गेल्या आठवड्यात 200 कोटींच्या निविदा काढल्या. त्या खुल्या करण्यात आल्या असून त्यानुसार त्यांना कामे देण्यात आली. मात्र, 24 कार्डसाठी स्वतंत्र निविदा मागविण्याऐवजी 1, 3 आणि 5 या झोनमध्ये परिमंडळ निहाय आणि कॉर्ड स्तरावर 13 ठिकाणी निविदा मागवण्यात आल्या. एकाच कामासाठी दोन पद्धतीने निविदा मागवण्याची पद्धत ही संशय निर्माण करणारी आहे. त्यामुळे यात उद्यान विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सिंडिकेट करून मिळवली कामे
परिमंडळ निहाय आणि 13 कॉर्डसाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये केवळ पाच कंपन्यांनी भाग घेतला आहे. यात डीबी इप्राटेक, हिरावती इंटर प्राईज यासह 5 कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी एकमेकांशी संगनमत करून दोन वेगवेगळे दरपत्रक देऊन त्यानुसार कंत्राटे आपापसात वाटून घेतल्यासारखे केले आहे. म्हणजे एका ठिकाणी एका कंपनीने जाणूनबुजून दर कमी ठेकले आहेत तर त्याच निविदेत दुसऱ्या कंपनीने दर जास्त ठेवले आहेत. असे इतर निविदांमध्ये करून ही कंत्राटे एकमेकांना कशी मिळतील, याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या पाच कंपन्यांनी सिंडिकेट करून ही कंत्राटे मिळवली आहेत, असा आरोप देवरे यांनी केला आहे.