कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई; गुन्हेगारी खपवून घेणार नाही, पोलीस अधीक्षकांचा इशारा

पुणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कुख्यात गँगस्टर निलेश घायवळला कारवाईचा दणका दिला आहे. त्याच्याविरूद्ध एमपीडीए अ‍ॅक्टनुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करून येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

निलेश बन्सीलाल घायवळ (वय 44, रा. कोथरुड) असे कारवाई केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी अपहरण असे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. त्याला नगर जिल्ह्यातील कर्जतमधून ताब्यात घेत कारवाई करण्यात आली आहे. निलेश घायवळ आणि गजानन मारणे टोळीच्या वर्चस्ववादातून शहरासह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्यात वाद झाल्यानंतर दोन स्वतंत्र गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, कुख्यात गजानन मारणे याच्या टोळीने 2009 मध्ये निलेश घायवळचा खूनाचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही टोळीचे वाद विकोपाला गेले होते.

कोथरूड पोलिसांनी 2017 मध्ये कुख्यात नीलेश घायवळ याच्याविरूद्ध मोकानुसार कारवाई केली होती. त्यानंतर 2020 मध्ये तो कारागृहातून सुटून बाहेर आला होता. त्यानंतर पुन्हा कोथरुड पोलिसांनी त्याच्यावर दोन वर्षे हद्दपारीची कारवाई केल्यानंतर घायवळ शहरातून बाहेर गेला होता. तडीपार काळात त्याने भिगवण पोलीस ठाण्यातंर्गत एका रेल्वे ठेकेदाराकडून खंडणी उकळण्यासाठी अपहरण केले होते.

ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील , अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दतात्रय जगताप, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पृथ्वीराज ताटे, रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अक्षय जावळे, इन्क्लाब पठाण, अंकुश माने यांच्या पथकाने केली आहे.

जिल्ह्यात 17 टोळ्यातील 74 जण हद्दपार
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी सराईतांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 कालावधीत 17 टोळ्यांमधील 74 गुन्हेगाराना हद्दपार केले आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील भिगवण, राजगड, आळेफाटा आणि शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळा उर्फ जगदीश पोपट दराडे, आप्पा ज्ञानदेव माने, राहुल अर्पण भोसले तसेच निलेश उर्फ नानु उर्फ नाना चंद्रकांत कुर्लप या चार टोळ्यांवर मोकानुसार कारवाई केली आहे. त्यातील 31 जणांवर मोकातंर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

गुन्हेगारी खपवून घेणार नाही, पोलीस अधीक्षकांचा इशारा
जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात काही ठिकाणी संघटित गुन्हेगारी आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. ग्रामीण भागात प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत कायदा सुव्यस्था राखण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या