जीवनशैली…झुम्बा… झुम्बा…

232

संग्राम चौगुले

मानसिकदृष्टय़ा आणि शारीरिकदृष्टय़ा अशा दोन्ही तऱहांनी झुम्बा या व्यायामाने फायदा होताना दिसतो. कारण संगीताच्या तालावर शरीर नकळत वेगाने हालचाल करते. त्यामुळे मनही मोकळा श्वास घेते.

योगासने, जिम, कार्डिओ, ऍरोबिक्स… यातच आता झुम्बा या नव्या व्यायाम प्रकाराने शहरांमधल्या लोकांना आता वेड लावलं आहे. झुम्बा हा प्रकार तसं पाहिलं तर ऍरोबिक्समधलीच एक ऑक्टिव्हिटी आहे. पण व्यायामाचा तो खूपच एनर्जेटिक फॉर्म आहे. त्यामुळे त्याच्यापासून शरीराला चांगला फायदा होतो.

झुम्बा या व्यायामप्रकारात ट्रेनर किंवा नृत्यदिग्दर्शक संगीताच्या ठेक्यावर अनेकांना थिरकायला लावतात. संगीताचा तालच असा असतो की नकळत आपल्याकडून त्या स्टेप्स होऊन जातात. झुम्बा डान्स आणि ऍरोबिक्स मुव्हमेंट्स यांच्यात म्हणूनच खूप साम्य दिसून येतं. मात्र ठेका धरता येईल अशा संगीतावरच झुम्बा हा व्यायाम प्रकार करता येतो. संगीतासाठीही हिप-हॉप, साम्बा, सालसा, मेरेंजू आणि माम्बो असे प्रकार वापरले तर चालते.

झुम्बाद्वारे झटपट आणि प्रभावीपणे व्यायाम होत असल्यामुळे तो केवळ लोकांमध्येच नाही, तर सर्वच फिटनेस सेंटर्स आणि जिम्समध्ये लोकप्रिय झाला आहे. या तीक्र गतीच्या व्यायाम प्रकारामुळे मधुमेही लोकांसाठी आणि फुफ्फुसाच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदा होताना दिसून येतो. जिममध्ये करण्यात आलेल्या व्यायामामुळे जेथे एक कॅलरी खर्च होत असेल तर झुम्बा केल्यामुळे दुप्पट किंवा तिप्पट कॅलरी बर्न होतात. या प्रकारात मोकळेपणाने नाचायला आणि उडय़ा मारायला मिळतात. त्यामुळे महिलांना झुम्बा हा व्यायामप्रकार प्रचंड आवडतो. बागेत किंवा जिममध्ये ट्रेडमिलवर धावण्यापेक्षाही प्रचंड ऊर्जा झुम्बा या प्रकारात खर्च होत असल्यामुळे खूप घाम येऊन बऱयाच कॅलरीज खर्च होतात.

मानसिकदृष्टय़ा आणि शारीरिक दृष्टय़ा अशा दोन्ही तऱहेने झुम्बा या व्यायामाने फायदा होताना दिसतो. कारण संगीताच्या तालावर शरीर नकळत वेगाने हालचाल करते. त्यामुळे मनही मोकळा श्वास घेते. त्याच वेगात तणाव आणि चिंता निघून जातात. मग एक अलौकिक अशी शांती मिळते. पण एकदा हा व्यायामप्रकार केला की अंग मात्र खूप दुखायला लागते असा अनुभव अनेकांना आला आहे. झुम्बा केल्यामुळे हृदयाला आणि फुफ्फुसांना खूपच फायदा होतो. काहीजण व्यायाम म्हणून नाही तर चक्क मनोरंजन, मजा येते म्हणून झुम्बा डान्समध्ये सहभागी होतात. पण त्यांनाही जेव्हा वजन कमी झाल्याचा आणि फॅट लॉस झाल्याचा परिणाम दिसतो तेव्हा तेही थक्क होतात.

झुम्बा हा व्यायामप्रकार आठवडय़ातून दोनदा किंवा तीनदा केलेला केव्हाही चांगला असतो. झुम्बामुळे स्नायू बळकट होतात. त्यामुळे हृदयाला त्याचा फायदा मिळतो. म्हणूनच ठरावीक आणि निश्चित कालावधीत हा व्यायाम चांगल्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली केल्यास त्याचा फायदा हमखास मिळतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या