ऑनलाइन बैठकीत ठरली इंडिया आघाडीची रणनीती, संसदेचे पावसाळी अधिवेशन गाजणार; उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचीही उपस्थिती

सोमवारपासून सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन देशातील ज्वलंत प्रश्नांवर गाजणार आहे. या अधिवेशनात मोदी सरकारला पुरते घेरण्याची रणनीती इंडिया आघाडीने आखली आहे. त्यासाठी आज ऑनलाइन बैठक झाली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेही बैठकीला उपस्थित होते.

अधिवेशनात उपस्थित करावयाच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा झाली. बिहारमध्ये निवडणूक आयोगाने सुरू केलेली मतदार फेरतपासणी, पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सुरू असलेला संशयकल्लोळ या मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरण, महिलांवरील वाढते अत्याचार, वाढती बेरोजगारी, शेतकऱयांवरील संकट हे मुद्दे अजेंडय़ावर होते. या सगळय़ा मुद्दय़ांवर सरकारला चर्चेस भाग पाडण्यासाठी आग्रही राहण्याचे बैठकीत ठरले.

बैठकीत दिसली ’इंडिया’ची एकजूट

इंडिया आघाडीतील 24 पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते. यात काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, सपाचे रामगोपाल यादव, माकपचे एम ए बेबी, भाकपचे डी. राजा, तेजस्वी यादव, सीपीआय (एमएल)चे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य आदी नेत्यांचा समावेश होता, अशी माहिती काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी दिली.