चेंबूरमध्ये सहाव्या मजल्यावरून सहा कामगार पडले, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना सहाव्या मजल्यावरून सहा कामगार पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी चेंबूरला घडली. या सहा जणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेंबूरच्या सुभाष नगर भागातील इमारत क्रमांक 36 मध्ये ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली आहे. बांधकाम सुरू असताना कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्यामुळे ते इमारतीवरून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिकांनी तातडीने सर्व कामगारांना उपचाराकरिता राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

शिवसेना मदतीला धावली

घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या सूचनेनुसार नगरसेवक सुनील मोरे, नगरसेवक सकीना शेख, उपविभागप्रमुख अजित भायजे, विधानसभा कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, इम्रान शेख, अशोक वंडेकर, हृदयनाथ राणे, विशाल चावक, मयूरेश नामदास, लोकेश फेपडे, पैलास फाळके, रोहित घनदट यावेळी उपस्थित होते.