देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध कामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजनासाठी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. याच्या दोन दिवस आधी म्हणजेच 10 जानेवारी रोजी आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय दिला जाणार आहे. या दोन घटना मांडत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. ’10 तारखेला एखाद्या घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे. मग तुम्हाला इतकी खात्री आहे की हे सरकार टीकणार आहे, टीकवलं जाणार आहे, म्हणून तुम्ही येत आहे? तुम्हाला निकाल माहिती आहे?’ असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.
राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले की “माननीय पंतप्रधान 12 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. इतका आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला. 10 तारखेला एखाद्या घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे. मग तुम्हाला इतकी खात्री आहे की हे सरकार टीकणार आहे, टीकवलं जाणार आहे, म्हणून तुम्ही येत आहे, तुम्हाला निकाल माहिती आहे. याचा अर्थ पंतप्रधानांना निर्णय माहिती आहे. निर्णय दिल्लीतून झालाय, ट्रायब्युनल फक्त त्याच्यावर शिक्का मारणार आहे. “
मुख्यमंत्री यांचा दावोस दौराही निश्चित झाला आहे, त्यावरूनही राऊत यांनी सवाल उपस्थित केले आहेत. जर आज ट्रायब्युनल निर्णय देणार असेल आणि तो घटनेनुसार देणार असेल आणि घटनेनुसार आपण सरकारसह अपात्र ठरणार असाल तर कोणत्या आत्मविश्वासाने आपण शिष्टमंडळ घेून दाव्होसला चालला आहात? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. ‘पंतप्रधान, मुख्यमंत्री भाजप आणि विधानसभेचे ट्रायब्युनल यांचे मॅच फिक्सिंग झाले असून त्या पद्धतीने निर्णय दिला जाईल असे आधीच ठरले असल्याने माननीय पंतप्रधान महाराष्ट्रात रोड शो करायला येत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री दाव्होसला जाणार आहे.’ असे राऊत यांनी म्हटले. पंतप्रधानांच्या दौऱ्यापासून दावोस दौऱ्यापर्यंत सगळ्या गोष्टी शिवसेना सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरूनही राऊत यांनी टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांची नियुक्ती ही न्यायप्रक्रिया देणारी एक व्यक्ती म्हणून केली आहे. ते न्यायदानाच्या खुर्चीवर बसलेले आहे. अशा व्यक्तीने तटस्थ राहिले पाहीजे असे संविधान म्हणते. मात्र हे पीठासीन अधिकारी या प्रकरणातील आरोपींना जाऊन भेटतात. यावर विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की मी कोणालाही भेटू शकतो आणि मतदारसंघातील कामासाठी भेटतो. मात्र राऊत यांनी म्हटले की, विधानसभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल असे सांगतो की एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात. ते स्वत: जात नाही. ‘तुम्ही का गेलात हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही मॅच फिक्सिंगची डेट, मॅच फिक्सिंग कसे असावे हे ठरवण्यासाठी गेला होता.’ अशी टीका राऊत यांनी केली.