
> सिद्धार्थ म्हात्रे
अवनी (टी 1) वाघिणीच्या ‘नरभक्षक’ उगमाची अन् अस्ताची कथा सांगत मानव-वाघ संघर्षातील संवेदनशील विश्व उलगडवून दाखवणारी अर्पणपत्रिका.
कधी आरे कॉलनीतला एखादा बिबट्या मानवी वस्तीत येऊन हल्ला करून जातो तर कधी कोथरूड सारख्या अगदीच शहरी भागात एखादा रानगवा धुडगूस घालतो. आपल्यासारख्या शहरी वळणाच्या माणसांना प्राण्यांचा एवढासा हस्तक्षेप ही सहन होत नाही तर जे प्रत्यक्ष व्याघ्र प्रकल्पाला खेटून राहतात त्यांची व्यथा काय असेल याविषयी काही वाचायचं असेल, वाघ आणि माणसांचा संघर्ष, त्याला लागून येणारे असंख्य प्रश्न यांची माहिती घ्यायची असेल तर ‘अवनी T1 : एका नरभक्षक वाघिणीची सत्यकथा’ हे नवाब शफाअत अली खान यांचं पुस्तक वाचायला हवं. ही कथा आहे अवनी (टी 1) वाघिणीच्या ‘नरभक्षक’ उगमाची आणि मग अस्ताची देखील! व्याघ्र प्रकल्पातील एक वाघीण ते पंचवीस ते तीस गावातील जवळजवळ एकवीस हजार लोकांना आपल्या अस्तित्वाने जगणं मुश्किल करणारी नरभक्षक वाघीण ! तिच्या दहशतीच्या शेवटाचे अनेक पैलू उलगडून दाखवणारी ही कथा आणि या संघर्षातून ज्यांनी आपला जीव गमावला ती माणसं आणि खुद्द अवनीचा मृत्यू मागे टाकत असतानाच हा अटळ संघर्ष लक्षात घेऊन भविष्याला आणि नव्या उमेदीला वाहिलेली अर्पणपत्रिका!
वन्यजीव आणि मानवी संघर्ष नवा नाही. बरं कोण कोणाच्या सीमा ओलांडतेय हे आपल्याला नीट सांगता येत नाही. या पुस्तकात हा संघर्ष तर आहेच पण एखादा वाघ नरभक्षक झाल्यानंतर तिथल्या परिसरात किती अनागोंदी माजते याविषयी आपल्या वाचायला मिळतं. नवाब शफाअत अली खान हे या क्षेत्रातले अनुभवी नाव. त्यांना वन विभागाकडून अवनीला ठार मारण्यासाठीचे अधिकृत पत्र मिळाले तो क्षण ते वन्यजीव आणि मानवी संघर्ष, त्यात येणाऱया न्यायालयीन अडचणी, याबाबत विविध एनजीओंकडून होणारा हस्तक्षेप हा सगळा प्रवास आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो.
प्रत्यक्ष जंगलाजवळ राहणाऱया लोकांना अनेकदा शेती हाच एकमेव व्यवसाय असतो. अवनी वाघिणीने जेव्हा माणसांची शिकार करायला सुरुवात केली तेव्हापासून जवळजवळ अडीच वर्षांच्या काळात 21 हजार लोकांना या दहशतीचा सामना करावा लागला. सलग दोन-अडीच वर्षे अवनीच्या भीतीपोटी लोक घराबाहेर पडायला घाबरत होते. अशा परिस्थितीत त्यांच्या पिकांचे अन्य जंगली प्राण्यांकडून नुकसान होऊ लागले. लोकांकडून वनखात्यावर दबाव वाढू लागल्यानंतर परिस्थिती आणखीच गंभीर होऊ लागली. आपण अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर बाबी खरंच लक्षात घेतो का हाही प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने पडतो. कोणत्याही राज्याच्या वनखात्याला, अधिकाऱयांना किंवा अगदी अधिकृतपणे मदत घेतली गेलेल्या एखाद्या यंत्रणेला एखाद्या वाघाला जीवे मारून आनंद होणार नसतोच. एरवी एखाद्या वाघिणीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तिच्या बछडय़ांची सर्वतोपरी काळजी घेताना आपल्याला हेच वनखाते दिसते. सोबत वाघाला मारण्याच्या विरोधात असणाऱया एनजीओ किंवा व्यक्ती यांचीही भूमिका चुकीची नसते. हेच सगळं मांडत हे पुस्तक एखाद्या टायगर सफारीत फिरून वाघ पाहणं वेगळं आणि प्रत्यक्षात जंगलाचं विश्व निराळं याची जाणीव, यातील फरक अधोरेखित करते.
मूळ इंग्रजीत असलेल्या या पुस्तकाचं मराठीत शब्दांकन व संपादन पामसिंह पाटील आणि श्रीनिवास कचरे यांनी अतिशय सुंदररित्या केले आहे. त्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. पुस्तकाची मांडणी व मुद्रण अतिशय नेटकेपणाने केलेले आहे त्याचा मुद्दाम इथे उल्लेख करायला हवा.
अवनीला ठार केल्यांनतर शफाअत अली खान यांच्यावर बरीच टीका झाली. अनेक आरोप प्रत्यारोपांचा सामना केलेल्या खान यांनी आपली भूमिका आणि या मोहिमेचे पैलू या माध्यमातून समोर ठेवले आहेत ते वाचूनच आपण मत व्यक्त करायला हवं. पुस्तकात ते एके ठिकाणी ते म्हणतात, ’मी संविधान मानणारा आणि पाळणारा व्यक्ती असल्याने मला नियुक्त केलेले सर्व ऑपरेशन काटेकोरपणे कायद्यानुसार आणि श्रद्धेने पार पाडतो.’ या त्यांच्या वाक्यातून त्याचा संविधानाविषयीचा आदर आणि कामावरील निष्ठा सहज लक्षात येते.
संपूर्ण पुस्तकात आहे ती दहशत, वाघाचं जग आणि जंगलाचे कायदे आणि आहे तो मृत्यूचा थरार… माणसांच्या आणि अवनीचादेखील! पण मग पहिल्या पानावरची अर्पणपत्रिका आठवते. अवनी (टी 1) वाघिणीने ज्या कुटुंबप्रमुखाला ठार केलं त्याची पत्नी मंगला आणि मुलींना आणि ज्यांनी अवनीच्या हल्ल्यात आपला जीव गमावला त्या ग्रामस्थांना हे पुस्तक अर्पण केले आहे. याच मंगलाने लेखक आणि त्यांच्या मुलाला निरोप देताना मुलाच्या हातावर पै-पै गोळा केलेलं 400 रुपये ठेवले. मंगलाच्या लेखी ही कृतज्ञताच होती. तसेच लेखकाने बिहार येथे वाचवलेली, सध्या पटना प्राणी संग्रहालयात असणारी तरुण हत्तीण लक्ष्मीलादेखील हे पुस्तक अर्पण केले आहे. एका हातात बंदूक धरून नेमून दिलेलं काम पूर्ण करणारा जबाबदार माणूस तर दुसऱया हाताने भविष्य सुरक्षित करून ते फुलवणारा एक संवेदनशील माणूस. ही दोन्ही रूपं वाचकाला या पुस्तकात अनुभवायला, पाहायला मिळतात.
अवनी T1 एका नरभक्षक वाघिणीची सत्यकथा
लेखक : नवाब शफाअत अली खान
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे