
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
वैवाहिक नात्यात गैरसमज ही जरी सामान्य बाब असली तरी ती इतरांमुळे होते हे कटूसत्य बऱ्याचशा घटस्फोटांचे कारण बनलेले आहे. यात गमतीची गोष्ट ही की जोडप्यांनाही हे मान्य असते आणि ‘स्वतचा संसार हा स्वतच करायचा असतो’ हेही समजते, पण काही जोडप्यांना हे शक्य होत नाही. यामुळे बरीच नाती ही रुजण्याआधीच कोलमडून पडतात अन् हे जेव्हा कळते तेव्हा पश्चातापाची वेळ येते.
पराग (नाव बदलले आहे) समुपदेशनाच्या सत्राला येताना भरपूर चिंतेत होता. इतका चिंतेत की त्याने आदल्या दिवशीही
ऑफिसमधून रजा घेतली होती. एरवी स्वतच्या सत्रांसाठी येताना तो ऑफिसमधून थेट येई, मात्र आजची परिस्थिती थोडी वेगळी होती. आज त्याच्याबरोबर त्याची पत्नी रजनीही (नाव बदलले आहे) येणार होती. अर्थातच, ते दोघे वेगवेगळे उपस्थित राहणार होते.
पराग आणि रजनीचा प्रेमविवाह दोन वर्षांपूर्वी झालेला होता. दोघांची ओळख ऑफिसमधील एका ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये झाली. नंतर एकाच डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. दोघंही परिपक्व होते आणि लग्नाच्या बाबतही गंभीर होते. त्यामुळे दोघांच्याही घरच्यांचा फारसा विरोध झाला नाही. मात्र रजनीचे आई-वडील लग्नाला तसे उत्सुक नव्हते. कारण; पराग – रजनीचं लग्न हे आंतरजातीय होतं. रजनीच्या हट्टापायी त्यांनी या विवाहास होकार दिला खरा, पण परागच्या घरातील पद्धतींबाबतीत ते नाखूश असायचे. परागचे घर हे मोकळे आणि त्याचे आई-वडील आधुनिक विचारांचे होते तर उलट रजनीचे पालक काहीसे कर्मठ.
साहजिकच तिच्या पालकांचा, विशेषत तिच्या वडिलांचा हस्तक्षेप रजनीकरवी तिच्या सासरी व्हायला लागला. अगदी घरात साधी देवपूजा असेल तरीही त्यात ‘असं केलं तर बरं होईल’ हे ती सांगायला लागली, तेही तिच्या वडिलांच्या सल्ल्यानेच. सुरुवातीला; परागच्या घरच्यांनी छोट्या मोठ्या घरगुती गोष्टींमध्ये तिच्या पालकांचा सल्ला मानलाही. कारण; त्याचे आई-वडील कोणाचंही मन दुखावणारे नव्हते, पण नंतर-नंतर मात्र ‘तुम्हाला अगदीच कसं कळत नाही हो’ असं तिच्या वडिलांचं खोचक बोलणं आणि ‘तुमच्यामध्ये हे असंच… नॉन्सेन्स! आम्ही आहोत म्हणून तुमचं व्यवस्थित’ असं तिचं खिल्ली उडवणारं बोलणं हे परागच्या घरच्यांना, विशेषत परागला क्लेशकारक व्हायला लागलं. त्यातून दोघांचेही खटके उडायला लागले आणि एक दिवस रजनी घर सोडून गेली. ‘अर्थ आहे का या अशा वागण्याला?’ पराग सत्रामध्ये वैतागत म्हणाला.
‘तुला लावायचाय तो अर्थ लाव. नाहीतरी तुझी त्यात मास्टरी आहेच.’ रजनी त्याचं म्हणणं उडवत म्हणाली. परागने बोलण्यास सुरुवात केली. ‘मॅम, मी कबूल करतो की मी जजमेंटल आहे, पण हिच्याबाबतीत नाही तर सर्वच बाबतीत, पण रजनी डायरेक्ट नातं तोडायलाच निघाली आहे.’
‘आता तू कितीही सुधार आणि तुझ्या घरच्यांची बाजू घे, पण तुझ्याबरोबर राहणं मला काही शक्य नाही.’ रजनीने पुन्हा आपला मुद्दा उचलून धरला.
‘अगं, मी कबूल करतोय ना की मी चूक केली म्हणून. तू तरी कुठे बरोबर होतीस सगळ्य़ाच बाबतीत?’ पराग म्हणाला.
‘मॅम, परागला माझे वीक पॉइंट्स माहीत आहेत. मला इमोशनल ब्लाकमेल करायला त्याला लगेच जमतं. आता यापुढे तोच बरंच इमोशनल ब्लॅकमेल करेल. त्याआधी मी माहेरी का गेले हे सांगते.’ असं सांगत रजनीने तिची नाराजी कशाबद्दल आहे हे सांगायला सुरुवात केली. तिच्या मते, तिचे सासू आणि सासरे तिच्या घरच्यांची अप्रत्यक्षरीत्या फजिती उडवत असत. त्यासाठी तिने भरपूर दाखले दिलेही. तिच्या घरच्यांना ‘बुरसटलेले’ म्हणणं तिला खूप दुखावून जात होतं. तसंच परागही उघडपणे तिच्या वडिलांचे सल्ले मानत नव्हता.
‘माझे बाबा स्वतचा रिस्पेक्ट बाजूला ठेवून सणासुदीला किंवा चांगल्या कार्यावेळी आवर्जून मला फोन करून मला काही बोलायचे. पण हे लोक कानाडोळा करायचे. पराग तर बाबांना हसायचादेखील. मलाही माहीत आहे की, या जुन्या पद्धतींमध्ये अडकायचं नसतं. पण कोणाची तरी फिलिंग असते ना… त्याचा रिस्पेक्ट नको का?’ रजनीने भरल्या आवाजात विचारलं.
‘रिस्पेक्ट असतो, पण जर आम्हाला खिजवत असेल किंवा आम्हाला मूर्ख म्हणून समजावत असेल तर…?’ परागने प्रतिप्रश्न केला.
‘रजनीच्या नक्की टोकाच्या भूमिकेचं कारण काय?’ असा दोघांनाही प्रश्न जेव्हा केला गेला तेव्हा रजनी शांत झाली, पण परागने बोलणे सुरू ठेवले.
‘दिवाळीला पहिल्या दिवशी आईने आम्हाला ओवाळलं नाही हे काही घर सोडून जाण्याचं कारण आहे का?’
रजनीकडे पाहिलं असता ती तडक उत्तरली, ‘नाही मॅम; हे कारण नव्हतं. अॅक्च्युली…’ थोडं थांबून ती खाली मान घालून म्हणाली; ‘मी आईंना म्हटलं की ओवाळत का नाही? तर त्या पटकन म्हणाल्या… अगं, तू तुझ्या वडिलांसारखी त्यातच अडकून पडू नकोस. मग मला राग आला आणि मी त्यांना बोलले… वडिलांना मध्ये आणायचं कारण नव्हतं.’
‘हो… पण त्यातच तू नको नको ते आईला बोलून गेलीस. आणि वर हेही म्हणालीस की आम्हाला पद्धती नाहीत म्हणून.’ पराग जवळ जवळ तिच्या अंगावर ओरडलाच.
रजनी खाली मान घालून बसली. पराग आणि रजनी या दोघांमध्ये आपापसांत असं भांडणाचं काही ठोस कारण नव्हतंच. त्या दोघांच्याही वैयक्तिक सत्रांतून ते जाणवलंही होतं. दोघांनाही एकमेकांच्या सहवासात आवडायचे देखील, मात्र जेव्हा रजनीच्या पालकांचा जास्तच हस्तक्षेप त्यांच्या संसारात आणि सासरच्या खासगी गोष्टींमध्ये वाढायला लागला तेव्हा मात्र नव्या नवलाईचे दिवस संपले आणि त्याची जागा अहंकाराने घेतली. त्यामुळे विसंवाद आणि गैरसमजसुद्धा निर्माण होऊ लागले. ही सर्व फक्त दोघांमध्ये नव्हतं तर घरातल्यांमध्येही ‘आम्ही कमी आहोत का?’ हा समज तयार झाला. आणि त्याला कारणेही होती.
रजनीशी वैयक्तिक सत्रांमध्ये बोलताना हे स्पष्ट जाणवत होते की तिच्या पालकांना स्वतच्या घराण्याचा प्रचंड अभिमान होता आणि त्यातून ते इतरांचा अपमान करत असत आणि त्याचे त्यांना काहीही वाटत नसे. या अभिमानातूनच तिच्या वडिलांनी जुन्या पद्धती आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरांना हट्टाने सुरू ठेवले होतेच, पण त्या इतरांनीही पाळाव्यात म्हणून ते रजनीकरवी दबाव टाकत असत. रजनी आपल्या पालकांच्या प्रेमापोटी हे सगळं करत राहिली. त्यात तिने स्वतची विवेकबुद्धी मात्र गमावली होती आणि आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत होती.
वैवाहिक नात्यात गैरसमज ही जरी सामान्य बाब असली तरी ती इतरांमुळे होते हे कटूसत्य बऱ्याचशा घटस्फोटांचे कारण बनलेले आहे. पतीपत्नीच्या नात्यात अथवा त्यांच्या संसारात त्यांच्या स्वतच्या पालकांचा, नातेवाईकांचा, मित्रमैत्रिणींचा किंवा काही उदाहरणांमध्ये शेजाऱ्यांचाही हस्तक्षेप काडीमोडाचे कारण ठरत आहे. य्त्यात जोडीदारापैकी एकाचा कमी आत्मविश्वास किंवा जोडीदारावर विश्वासाचा अभाव असणं, नातं जोडताना केली गेलेली भरपूर तडजोड, स्वतच्या जोडीदाराबरोबर मन मोकळं न करणं, एकमेकांबरोबर खटकणाऱ्या गोष्टी वेळच्या वेळी एकमेकांनाच बोलून न दाखवणं आणि इतरांकडे सांगणं यामुळे बरीच नाती ही रुजण्याआधीच कोलमडून पडतात. हे जेव्हा कळते तेव्हा पश्चातापाची वेळ येते. यावरचा तोडगा जरी सोप्पा असला तरी बऱयाच जोडप्यांना तो अंगीकारता येत नाही, पण म्हणून त्यावर काम करायला हरकत नाही ना?
‘पण मी काय करू आता?’ रजनीला आता आपली चूक सुधारायची होती. तिला पश्चाताप तर होत होताच. आणि तिला तिच्या वडिलांनाही दुखवायचे नव्हते. ‘तू सासरमध्ये घडणाऱ्या सगळ्याच गोष्टींची माहिती तुझ्या पालकांना नाहीच सांगितलीस तर?’ हे विचारताच रजनी हसली. ‘ते मी करीनच, पण सासरच्यांचा राग?’ तिला शंका होती.
‘डोन्ट वरी! मी सांभाळून घेईन. इनफॅक्ट आपण दोघंही त्यातून वे आऊट काढू, पण तू आता पुन्हा कधीही हे असं टोकाचं पाऊल उचलू नकोस. प्लिज!’ पराग पोटतिडकीने रजनीला म्हणाला.
रजनी आणि पराग आता एकत्र आले, पण इथे नमूद करावंसं वाटतं की एकाने (परागने) शांतपणे ही परिस्थिती हाताळली होती तसंच घरची आघाडीही संयमाने सांभाळली होती. त्यात त्याच्या आई-वडिलांनीही धीर दाखवला हेही सांगावेसे वाटते. त्याने किंवा त्याच्या घरच्यांनी जर स्वतचा अहंकार जर नात्यात आणला असता तर हे नाते नक्कीच तुटले असते.