
>> संजय मोने
त्याचं नाव मनोज सखानाथ पर्वतकर. नड्डा हा त्याचा स्वभाव विशेष. कारण तो प्रत्येक बाबतीत नडत असणारा. कधी ते योग्य तर कधी ते उगाचच. म्हणून त्याला कुणीतरी नड्डा हे नाव दिलं. त्याचं हे वागणं लहानपणापासून आहे. त्याच्या घरी भिंतीवर लटकलेले पूर्वजांचे फोटो बघितले तर एक गोष्ट सामाईक ती म्हणजे कपाळावरच्या आठीच्या रूपात प्रत्येकाच्या चेहऱयावर स्वच्छ दिसणारा खत्रूडपणा.
एका राष्ट्रीय पक्षाच्या नावाशी आजच्या लेखाच्या नायकाशी काडीमात्र संबंध नाही. त्यांचं ते आडनाव असू शकेल. आपल्या नायकाचा तो स्वभाव विशेष आहे. त्याचं नाव मनोज सखानाथ पर्वतकर. वडिलांचं सखानाथ हे नाव मी यापूर्वी कुठेच ऐकलेलं नाही आणि पुढेही ऐकेन असंही वाटत नाही. मनोज प्रत्येक बाबतीत नडत असतो. कधी ते योग्य असतं तर कधी ते उगाचच असतं. म्हणून त्याला कुणीतरी नड्डा हे नाव दिलं. त्याचं हे वागणं लहानपणापासून आहे. त्याच्या घरी भिंतीवर लटकलेले पूर्वजांचे फोटो बघितले तर एक गोष्ट सामाईक आहे आणि ती म्हणजे कपाळावरच्या आठीच्या रूपात प्रत्येकाच्या चेहऱयावर स्वच्छ दिसणारा खत्रूडपणा. तेव्हा एका दुकानदाराने विक्री वाढावी म्हणून सात दिवसांसाठी दुकानातल्या तेलाच्या बाटलीवर ‘दोनवर एक बक्षीस’ अशा योजनेचा फलक लावला. पहिल्याच दिवशी नड्डाचे बाबा आणि आजोबा त्या दुकानात जाऊन आठ बाटल्या विकत घेऊन आले. बरोबर चार बाटल्या बक्षीस. आता इतकं ओझं कसं घरी नेणार? म्हणून दुकानदाराला विनंती केली. त्याने तो मराठी नसल्याने बाटल्या घरपोच केल्या. दुसऱया दिवशी पुन्हा आठ बाटल्या आणि वरच्या चार घरपोच. तिसऱया दिवशी आजोबांनी दुकानात एक हजार बाटल्यांची ऑर्डर दिली आणि वरच्या बक्षिसाच्या बाटल्या घरपोच करायला सांगितलं. दुकानदाराने त्यांना टेम्पो आणायला सांगितला.
“त्याचे पैसे तुम्ही द्यायचे. कारण आधीच्या दोन दिवसांच्या ऑर्डर्स तुम्ही घरपोच केल्या होत्या’’… इति आजोबा.
“ती वात (बात) अलग होती. अवे एटली बाटली…’’
“मग हा फलक कशाला लावलाय? आम्हाला काय मूर्ख समजलात?’’ आजोबांचा आवाज तीनही सप्तकात फिरला. अगदी नानासाहेब फाटकांची आठवण यावी असा. त्या आवाजाने गर्दी जमली. त्या दुकानदाराने ओल्या फडक्याने तो लिहिलेला फलक पुसला. आदल्या दोन दिवसांच्या बाटल्या परत घेतल्या. पैसे परत दिले. मात्र बक्षीस बाटल्या आजोबांच्या घरीच राहिल्या. गोष्ट एवढीशीच, पण नड्डा त्यातून घडत गेला. तो 18-20 वर्षांचा होता तेव्हा आजोबा पृथ्वीतलावरील मानवजातीला छळायचं काम अर्ध्यावर सोडून वरच्या जगात गेले, पण नड्डाच्या बाबांनी त्यांचा वारसा जपला. सुट्टीत मी माझ्या काकांच्या घरी राहायला गेलो होतो. तिथे नड्डा मला पहिल्यांदा भेटला. 14-15 वर्षांचा मुलगा. चाळीतल्या मधल्या छोटय़ाशा जागेत आमच्या क्रिकेटचे सामने व्हायचे. एकदा चेंडू तळमजल्यावर असलेल्या एका घरात गेला. मालकाने चेंडू कापून परत केला. सगळे हिरमुसले. नंतर आम्ही सगळे तो प्रकार विसरून इतर खेळ खेळू लागलो. सगळे विसरले होते, पण नड्डा विसरला नव्हता. काही दिवसांनी दिवाळी आली तेव्हा पहिल्या आंघोळीनंतर एक फळ पायाखाली फोडायचं असतं. कुठून कसं माहीत नाही, पण आदल्या रात्री नड्डाने त्या फळात लालभडक रंग इंजेक्शनच्या सुईने आत सोडला आणि ती फळं मालकांच्या दाराबाहेर ठेवली. फुकट मिळाली म्हणून काकांनी ती आंघोळीनंतर पायाने फोडली. मालकिणीची गगनभेदी किंकाळी सगळ्या चाळीत ऐकू आली.
“करणी झाली काकू! करणीच ही’’ 16-17 वर्षांचा नड्डा ओरडला. काकूंनी रडत रडत बसकण मारली. मालक गुडघ्यापर्यंत लालेलाल झालेला पाय घेऊन हैराण झाले होते.
“आता? याच्यावर उपाय काय?’’ काकूंचे प्राण कंठाशी आले.
“सोप्पा उपाय आहे. दोन रुपये द्या. एक बेलपत्र वाहून येतो. सगळं ठीक होईल.’’
“दोन रुपयांना एक बेलपत्र?’’ काका ओरडले.
“नकोय? जाऊ दे.’’ नड्डा तिथून निघाला.
“गप्प बसा. मनोज, दोन रुपये देते तुला.’’ काकूंनी जाऊन दोन रुपये आणून दिले. नड्डा जरा बाहेर गल्लीत गेला आणि परत आला.
“काका! आता हे फळ फोडा!’’
एक फळ आणलं गेलं. काकांनी ते फोडलं. लाल रंग बिलकूल आला नाही. काकूंनी दिलेल्या पैशांतून चेंडू आणले गेले. नंतर कधीही चेंडू कापला गेला नाही. पुढे काकांची चाळ पाडून तिथे इमारत झाली. वाचकहो! तुम्हाला जाणवलं की नाही मला माहीत नाही, पण पाडल्या गेलेल्या प्रत्येक वास्तूबरोबर तिथली माणसं, त्यांची वैयक्तिक वैशिष्टय़ं लोप पावली. असो! मला नड्डा पुन्हा फोनवर भेटला.