उमेद- निःस्वार्थ रुग्णसेवेचा वसा

>> सुरेश चव्हाण

‘सर्वव्यापी निरपेक्ष रुग्णसेवे’चे व्रत हाती घेऊन गेली 21 वर्षे ‘सुहास कबरे’ यांच्या ‘राजहंस प्रतिष्ठान ट्रस्ट’च्या माध्यमातून आजवर लाखो गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपकरणे विनामूल्य पुरवली जात आहेत. सोबतच कर्करोग, ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान, मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान यांविषयी व्याख्याने व शिबिरांद्वारे अखंड जनजागृतीही सुरू आहे.

गरीब, गरजू रुग्णांना वैद्यकीय सोयीसुविधा व आजारपणातील साधने त्यांच्या घरीच उपलब्ध करून देण्याचा विचार काही वर्षांपूर्वी सुहास कबरे यांच्या मनात घोळत होता. त्यांची आई भारती कबरे यांना असलेली रुग्णसेवेची आवडच त्यांच्यात आली असावी. यातूनच 2003 साली ‘राजहंस प्रतिष्ठान ट्रस्ट’ ही संस्था त्यांनी स्थापन केली. संस्थेच्या माध्यमातून गरीब तसेच गरजू रुग्णांना वैद्यकीय उपकरणे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी सुरुवातीला सुहासजींनी स्वतकडचे 25 हजार खर्चून काही उपकरणे जमा केली व हॉस्पिटल्स, स्थानिक डॉक्टर्स तसेच काही ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थांना भेटी देऊन या उपक्रमाविषयीची माहिती दिली. गरजूंना घरी वापरण्यासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना केवळ फोन किंवा ई-मेल केल्यावर ते त्यांना घेऊन जायला सांगतात. कोणतेही डिपॉझिट अथवा भाडे न आकारून तसेच कालमर्यादेशिवाय या सेवेचा लाभ घेता येतो. त्यामध्ये हॉस्पिटल बेड (फाउलर बेड), ऑक्सिजन सिलिंडर, व्हीलचेअर, वॉकर, कुबडय़ा आदी उपकरणांचा समावेश आहे.

आता तर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांपैकी ‘सी पॅप, बायपॅप’ या मशिन्स श्वसनाचा त्रास असणाऱया व ज्यांची फुप्फुसे निकामी झाली आहेत, अशा रुग्णांना पुरवली जातात. त्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. रुग्णांच्या नातेवाईकांनी ही उपकरणे नेऊन त्यांचा वापर करून झाल्यावर; ती चांगल्या स्थितीत परत आणून द्यावीत, इतकीच माफक अपेक्षा असते. त्याचबरोबर उपकरणे वापरून परत आणून दिल्यावर संस्थेला त्यांना काही आर्थिक मदत करावयाची असल्यास ती स्वीकारली जाते. अशा देणग्यांमधूनच नवीन उपकरणे खरेदी केली जातात. मात्र पैसे देण्याची कसलीही सक्ती कोणावरही केली जात नाही.

सुरुवातीला कबरे स्वत रुग्णांच्या घरी जाऊन उपकरणे बसवून देत असत. ज्या कंपन्यांकडून उपकरणे विकत घेतली; त्या कंपन्यांच्या तंत्रज्ञांकडून उपकरणे जोडण्याचे आणि वापरण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. या कामामुळे ते समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या संपर्कात आले. त्यातून त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव आले. यासंबंधित एक उदाहरण ते आवर्जून सांगतात, ‘एकदा एका गरीब, धुणी-भांडी करणाऱ्या भगिनीच्या पतीला फाउलर बेडची गरज होती. तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. ती बेड घेऊन गेली व तिचे पती बरे झाल्यावर तो परत करताना कृतज्ञता म्हणून मोठी रक्कम संस्थेला देणगी म्हणून देण्यासाठी घेऊन आली. तिच्या परिस्थितीची कल्पना असल्यामुळे तिच्याकडून देणगी म्हणून एवढे पैसे घेणे मला उचित वाटेना, पण तिच्या आग्रहाखातर त्यातील काही रक्कम मी देणगी म्हणून स्वीकारली. पण अनेकदा याच्या उलटही अनुभव येतो. उपकरणे घेऊन जाणारे सुस्थितीतील लोकही ती परत करताना संस्थेला छदामही देत नाहीत.

‘रुग्णसेवा हेच ध्येय’ डोळय़ांसमोर ठेवून आरोग्याशी निगडित अनेक उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील कुठलीही माहिती उदा. रक्तपेढय़ांचे संपर्क क्रमांक, प्रशिक्षित नर्स व आयांची यादी, मरणोत्तर नेत्रदान व देहदानासंबंधीची माहिती या सर्वांचा तपशील त्यांच्याकडे तयार असतो. कोकणात सिंधुदुर्ग जिह्यातील पाट-कोचरा या सुहासजींच्या छोटय़ाशा गावातही वेगवेगळ्या तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. ‘आम्ही रुग्णसेवेच्या पालखीचे भोई!’ या संकल्पनेअंतर्गत कर्करोग, ब्रेनडेड झालेल्या रुग्णांचे अवयवदान, मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान याविषयी जनजागृतीसाठी सुहासजी स्वत व्याख्याने देतात.

सुहासजी उत्तम तबलावादक आहेत. रुग्णसेवेबरोबरच त्यांची कला सेवाही सुरू आहे. काही वर्षांपूर्वी गायनाची आवड असलेल्या लहान मुलांना एकत्रित करून त्यांनी ‘होऊ कसे उतराई!’ हा वाद्यवृंद सुरू केला होता. गेल्या दहा वर्षांपासून कलाक्षेत्र व सामाजिक क्षेत्रातील प्रतिभावान मान्यवरांना राजहंस प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. तसेच गेली पाच वर्षे विविध विषयांवर व्याख्यानमालाही घेण्यात येत आहे. सुहासजींच्या पत्नी शारदाताई व भक्ती आणि भैरवी या त्यांच्या दोन्ही मुली यांसोबतच संस्थेचे अनेक सेवाभावी कार्यकर्तेही त्यांना मोलाची साथ देत आहेत. मात्र संस्थेकडील 42 लाखांची वैद्यकीय उपकरणे ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने सध्या एका छोटय़ाशा जागेत ती ठेवली जात आहेत.

सुहास कबरे यांच्या सामाजिक क्षेत्रातील आजवरच्या योगदानाबद्दल त्यांना उत्तुंग प्रतिष्ठानतर्फे उत्तुंग सेवाव्रती पुरस्कार, स्व. अभ्यंकर स्मृती पुरस्कार, श्वास फाऊंडेशनतर्फे सन्मान, केशव गोरे स्मारकाच्या वतीने अनंत नथोबा साठे समाजसेवा पुरस्कार, सावरकर केंद्र – विलेपार्ले यांच्या वतीने सावरकर समाजसेवा पुरस्कार, इंदिराबाई फडके सेवाव्रती विशेष पुरस्कार, शिवप्रेमी रुग्णसेवा गौरव पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

अत्यंत साधी, सरळ राहणी व निरपेक्ष सेवाभावी विचारसरणी असणारे सुहास कबरे, वयाच्या पंच्च्याहत्तरीत पदार्पण करीत असताना; गेली अनेक वर्षे हा अनोखा उपक्रम आपली नोकरी सांभाळत प्रामाणिकपणे राबवत आहेत. प्रतिष्ठानच्या आजच्या कामापेक्षाही व्यापक असे एक भव्य वैद्यकीय मदत केंद्र उभारण्याचे त्यांचे स्वप्न आहे. जिथे सर्व प्रकारच्या तपासण्या, त्याचबरोबर नेत्रचिकित्सा, डायलिसीस, रेडिओलॉजी व सोनोग्राफी या सुविधा एकत्रितपणे उपलब्ध होतील. समाजसेवेची तळमळ असलेले तज्ञ डॉक्टर्स तिथे आपला काही वेळ या सेवेसाठी देतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.

[email protected]