
ईव्हीएमविरुद्ध सोलापूर जिह्यात ठिकठिकाणी उठाव सुरू असून, मारकडवाडीनंतर आता पंढरपूर तालुक्यातील गादेगावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडने अभिनव आंदोलन केले. रोगट झालेल्या ईव्हीएम मशीनला भंगारात काढा, असे सांगत ईव्हीएमला चक्क प्रतीकात्मक सलाईन लावले.
मंगळवारी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करण्याचा दबाव टाकून हे मतदान रोखले. पोलिसांच्या दडपशाहीविरोधात राज्यभर प्रतिक्रिया उमटत आहेत.
आज पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील गावकऱयांनी एकत्र येत डमी ईव्हीएम मशीनला सलाईन लावत एकप्रकारे प्रतीकात्मक आंदोलन केले. यावेळी ‘बॅलेट पेपरवर मतदान झालेच पाहिजे’, ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘संविधानाचा, लोकशाहीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सोलापुरात आज काळ्या फिती लावून आंदोलन
सोलापुरातील पार्क चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उद्या (दि. 5) सायंकाळी पाच वाजता ‘ईव्हीएम हटाव, लोकशाही-संविधान बचाव’ यासाठी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.
मारकडवाडीतील 200 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल
पंढरपूर मारकडवाडीत होणारी बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया रोखल्यानंतरही पोलिसांकडून दडपशाही अद्याप सुरूच आहे. बेकायदेशीरपणे मतपत्रिकेद्वारे अभिरूप मतदान घेण्याचा प्रयत्न करणे, जमावबंदी असताना गावात लोकांची गर्दी जमा करणे आदी कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यासह 200हून अधिक ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.