पालिकेची 28 प्रदूषणकारी बांधकामांना नोटीस; पथकांकडून 868 प्रकल्पांची झाडाझडती

मुंबईत वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने बांधकामे आणि रस्ते कामांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली असून आज विविध पथकांकडून सर्व वॉर्डमध्ये 868 प्रकल्पांची तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रदूषणकारी 28 प्रकल्पांना नोटीस बजावून तातडीने प्रदूषण नियंत्रण नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून नियम मोडल्यास संबंधित बांधकाम सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिला आहे.

मुंबई महानगरात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होते आहे किंवा कसे, याची पाहणी करण्यासाठी सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये कालपर्यंत 868 बांधकामांच्या ठिकाणी पथकांनी भेटी दिल्या आहेत. संबंधित ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना तातडीने केल्या नाहीत तर काम थांबवण्याची नोटीस जारी करणे किंवा कामाचे ठिकाण सील करणे, यासारखी कठोर कारवाई करण्याचा इशारादेखील पालिकेने दिला आहे.

वातावरणातील बदलामुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने प्रभावी पावले उचलली आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा, अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.