
बोरिवली विभागात रस्ते विभागामार्फत सुरू असलेली रस्ते विकासाची कामे प्राधान्याने व जलदगतीने पावसाळय़ापूर्वी पूर्ण करावीत. तसेच पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत बोरिवली रेल्वे स्थानक परिसरातील प्रस्तावित कामाचा पहिला टप्पा पावसाळय़ापूर्वी पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी आज संबंधित अभियंत्यांना दिले. या कामांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी हे निर्देश दिले. या दौऱ्यात लालजी त्रिकमजी मुंबई पब्लिक स्कूल या शाळेला भेट देत महानगरपालिका आयक्त गगराणी यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज बोरिवली येथील आर मध्य विभाग अंतर्गत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची स्थळ पाहणी केली. त्यानंतर आर मध्य विभाग कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी उपआयुक्त भाग्यश्री कापसे, आर मध्य सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आयुक्त गगराणी म्हणाले, महानगरपालिकेच्या वतीने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. रस्ते विकास कामे दर्जेदार आणि अत्युच्च गुणवत्तापूर्ण होण्यासाठी महानगरपालिका अधिकारी-अभियंत्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. बोरिवली पश्चिम येथील ‘आर.डी.पी-10’ या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. अभियंत्यांनी साइट व्हिजिट करून कामांची पाहणी करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.
या ठिकाणांना दिली भेट
आर मध्य विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेल्या गोराई जेट्टी मार्ग, पंगत हॉटेलसमोर महात्मा फुले झोपडपट्टी निष्कासनानंतर करण्यात आलेले रस्ता रुंदीकरण आणि उद्यान विकसित कामांची महानगरपालिका आयुक्तांनी आज पाहणी केली. शिवाय बोरिवली पश्चिम येथे सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम उद्यानाच्या सुधारणा कामाचे आयुक्तांनी कौतुक केले. उद्यानातील अॅथलॅटिक ट्रक, सुशोभीकरण कामे इतरांसाठी अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. तत्पूर्वी त्यांनी नागरी सुविधा पेंद्राला भेट देत नागरिकांसमवेत संवादही साधला.