
राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे शिवकालीन ऐतिहासिक ठेवा आढळला आहे. या ऐतिहासिक ठेव्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा ठेवा पाहण्यासाठी या ठिकाणी सध्या गर्दी होत आहे.
मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार किमी लांबीच्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेची श्रमदानाने स्वच्छता केली. त्यातून या शिवकालीन पायवाटेवरील पुरातन श्री उगवाई देवीचे मंदीर, मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलेला आणि शिवकाळातील चौथाई सरदेशमुखीचे अधिकार दिल्याचे निर्देशन करणारा सुमारे दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख, सतत वाहणारा पाण्याचा झरा आदी शिवकालीन ऐतिहासिक ठेवा दृष्टिक्षेपात आल्याने येथील शिवकालीन इतिहास आता पुन्हा उलगडण्यास मदत झाली आहे.
येरडव ते अणुस्कुरा शिवकाळामध्ये रहदारी असलेली व सध्या दुर्लक्षित राहिलेल्या या पायवाटेने छत्रपती शिवाजी महाराज कोकणात आल्याचे सांगितले जाते.
घाटमाथ्यावरून कोकणात येणाऱ्या अनेक पायवाटा आहेत. कालपरत्वे रहदारी कमी झाल्याने या पायवाटा दुर्लक्षित आहेत. पायवाटांसह या मार्गावरील ऐतिहासिक ठेव्याचे जतन गरजेचे आहे.