साहित्य जगत- छावा

>> रविप्रकाश कुलकर्णी

एखादा चित्रपट जनसामान्यावर केवढा प्रभाव पाडतो याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट. ज्यात छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या संघर्षाची कहाणी विलक्षण परिणामकारकरीत्या दाखवली आहे. लेखक शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे, चित्रपट नामावलीत ‘छावा’ कादंबरी, त्याचे लेखक शिवाजी सावंत आणि प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस यांना श्रेय दिलेले आहे.

‘छावा’ चित्रपट व्यावसायिकरीत्या तर यशस्वी झालाच, पण दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या भाषणातदेखील याची दखल घ्यायला लागली. ही लाट ओळखून मेहता पब्लिशिंग हाऊसच्या अखिल मेहता यांनी ‘छावा’ चित्रपटातील फोटोचा वापर करून नवे मुखपृष्ठ केले आणि ‘छावा’ कादंबरीची नवी पंचविसावी आवृत्ती प्रकाशित केली. तसेच शिवाजी सावंत यांची मुलगी कादंबिनी धारप हिने ‘छावा’चा इंग्रजी अनुवाद केला होता तोदेखील प्रकाशित केला. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. यापूर्वी संभाजीराजे सिंहाचा जबडा ताणून त्याला जेरीस आणत आहेत असे चित्र रघुवीर मुळगावकर यांनी काढले होते ते दिसायचे. सध्या मात्र छावाचे पोस्टर झळकत आहे.

‘छावा’ कादंबरीची जन्मकथादेखील वेधक आहे. महाभारतातील कर्णावर अनेकांनी लिहिलेले आहे ते त्याच्या वाटय़ाला आलेल्या पोरकेपणाबद्दल. शोकांतिकेबद्दल… पण एक कादंबरी अशी आली की, त्यात कर्णाची प्रतिमा केवळ उजळवणारी नव्हती, तर त्याला मृत्युंजय ठरवले गेले. हे कर्णदर्शन लेखकाने इतके प्रत्ययकारी रंगवले होते की, परिणामी, ही कादंबरी विलक्षण गाजली. तो लेखक म्हणजेच शिवाजी सावंत आणि त्यांची पहिलीच कलाकृती मृत्युंजय!

त्यावेळी शिवाजी सावंत यांचे गावोगावी सत्कार झाले. अशातला एक सत्कार होता मुंबईतील मराठा मंदिर येथील जिवाजीराव शिंदे
हॉलमध्ये आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला सत्कार. यावेळी शिवाजी सावंत यांनी आपल्या आगामी कादंबरीतील काही भाग वाचून दाखवला. तो परिणामकारक होता. ते ऐकून आचार्य अत्रे तर म्हणाले, “हा तुमचा संभाजी, शिवाजी महाराजांपेक्षा मोठा तर होणार नाही ना?’’ तेव्हा शिवाजीराव म्हणाले, “शिवाजी महाराज म्हणजे सिंह होते. त्यांचा हा बछडा म्हणजे छावा. तो मी रंगवणार आहे.’’

शिवाजी सावंत यांना त्यांचा छावा सापडला होता तो इतिहासाचे भीष्माचार्य वा.सी. बेंद्रे यांच्या श्री छत्रपती संभाजी महाराज या ग्रंथराजातून. बेंद्रे यांनी चाळीस-पन्नास वर्षे अखंड ध्यास घेऊन सगळी कागदपत्रे, सामग्री धुंडाळून एक नवे सत्य मांडले. त्यासंबंधात या ग्रंथाच्या पुरस्कारात तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्राr जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘इतिहास साधनांच्या प्रचंड पर्वताच्या उत्खननाच्या उलाढालीत त्यांना जुना लोकप्रसिद्ध धर्मवीर, एक महान विभूती असलेला संभाजी गवसला. धर्माकरिता आत्यंतिक यातनांच्या अग्नीमध्ये शौर्याने व धीराने उभा राहून प्राण विसर्जित करणारा संभाजी दुर्व्यसनी, खुनी व धर्मभोळा म्हणून आजपर्यंत इतिहासलेखकांनी व नाटककारांनी दाखविला आहे. त्या सर्वांना खोटे ठरवून संभाजीराजांचे उज्ज्वल चित्र सप्रमाण दाखवून दिले. इथे शिवाजी सावंतांना त्यांचा छावा सापडला!

पण एक-दोन प्रकरणाच्या पुढे ‘छावा’चे लेखन होईना. कारणे वेगवेगळी. सत्कार, भाषणाचे दौरे, त्यात झडणाऱया पाटर्य़ा… यामुळे लेखन लांबणीवर पडू लागले. त्यांच्या एखाद्या चाहत्याने त्याची आठवण करून दिली की ते म्हणत, ‘चिंतन चालू आहे. लवकरच तुमच्या भेटीला छावा येईल…’

पण बेहिशेबी जगण्याची किंमत मोजायलाच लागते. शिवाजीराव अंथरुणाला खिळले. औषधोपचारांसाठी मदत करण्याची वेळ आली. त्यांना आर्थिक मदत करावी म्हणून केसरीमध्ये अग्रलेख लिहिला गेला. त्यात काही गैर जाऊ नये म्हणून तो अग्रलेख त्यांना दाखवण्यात आला. तेव्हा त्यांनी त्यात एका वाक्याची भर घातली, ‘याही स्थितीत हाती असलेली कादंबरी शिवाजी सावंत यांनी लेखनिकाच्या मदतीने नुकतीच पूर्ण केली आहे.’

…आणि अहो आश्चर्यम! 1979 मध्ये “छावा’ कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली. एका छाव्याचीच जिद्द होती. 18 सप्टेंबर 2002 मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले… आणि आता इतक्या वर्षांनी पुन्हा ‘छावा’ गाजतोय…