
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात 20 दिवसांत तब्बल 1 कोटी 43 लाख 12 हजार रुपयांची अमली पदार्थ जप्त करण्यात आले. नागपूरच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून ड्रग्ज माफियांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. राज्याच्या सीमेवरील आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानातून ड्रग्ज माफिया हे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या 20 दिवसांत 1 किलो 258 ग्रॅम एमडी ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला असून 167 आरोपींना अटक करण्यता आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिली. चार महिन्यांत 58 लाख 44 हजार रुपयांची अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात केवळ 380 ग्रॅम मेफेड्रोन, अफीम आणि गांजाचा समावेश असून 125 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पानमसाल्यापासून इंजेक्शनपर्यंत ड्रग्ज
पानमसाल्यातून ते इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी करण्यात येत आहे. मेफेड्रोन ड्रग्जचा वापर झपाटय़ाने वाढला असून या ड्रग्जचे सेवन अनेकदा पानमसाल्याच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. तसेच इंजेक्शनद्वारेही ड्रग्जचे सेवन केले जात आहे. 99 टक्के पानमसाल्यातून तर 1 टक्के इंजेक्शनमधून ड्रग्ज घेतले जात असल्याचे गुल्हाने यांनी सांगितले. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून अफीम, तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि ईशान्य राज्यातून गांजा नागपूरमध्ये आणला जातो. येथून इतर राज्यांमध्ये पुन्हा वितरीत केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागपूर हे ड्रग्ज तस्करीचे एक प्रमुख ‘ट्रांजिट पॉइंट’
नागपूर हे ड्रग्ज तस्करीचे प्रमुख ट्रांजिट पॉइंट बनले आहे. नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. शहरात पथके सक्रिय करण्यात आली आहेत. गुप्त माहिती मिळताच सापळा रचून ड्रग्ज विव्रेत्यांना अटक करण्यात येत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी पोलिसांनी 1933 हा हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.