अमेरिकेत एन्ट्री हवीय…तर आताच सोशल मीडिया अकाउंट पब्लिक करा; ट्रम्प यांच्या नियमाने घोर

अमेरिकेत शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर लोकांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. विद्यार्थ्यांसाठी व्हिसा मर्यादीत करण्याचा दणका दिल्यानंतर आता ट्रम्प यांनी जारी केलेल्या एका नियमाने पुन्हा सर्वांचा घोर वाढला आहे. आतापासून एफ, एम आणि जे व्हिसा श्रेणींमध्ये अर्ज करणाऱ्या सर्व लोकांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सार्वजनिक करावे लागणार असून हा नियम तात्काळ लागू केला जात आहे.

हिंदुस्थानातील अमेरिकन दुतावासाने याबाबत माहिती दिली आहे. हा नवीन नियम F, M आणि J व्हिसा श्रेणींमधील सर्व अर्जदारांना लागू आहे. F व्हिसा अमेरिकन महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. M व्हिसा हे शैक्षणिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांसाठी आहे. तर J व्हिसामध्ये एक्सचेंज विजिटर प्रोग्राममध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचा समावेश आहे.

अमेरिकन दूतावासाच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडिया अकाउंट सार्वजनिक केल्याने एखाद्या व्यक्तीची ओळख पटवणे सोपे होईल. अमेरिकेत प्रवेश करण्यासाठीची त्या व्यक्तीची योग्यतेवर निर्णय घेता येईल. व्हिसा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता राहील. संभाव्य धोके आधीच ओळखता यावेत म्हणून जगभरातील सर्व अमेरिकन व्हिसा कार्यालयांमध्ये हे नियम राबविले जात आहे.

व्हिसासाठी तुम्हाला तुमचे फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स प्लॅटफॉर्म, लिंक्डइन, यूट्यूब आणि जर तुमचे टिकटॉक अकाउंट असेल तर तेही सार्वजनिक करावे लागेल. याशिवाय, तुमची ऑनलाइन अॅक्टिव्हिटी दाखवणारे इतर कोणतेही प्लॅटफॉर्म देखील सार्वजनिक करावे लागेल.

आता तुम्ही काय करावे?
जे लोक अमेरिकेला जाण्याचा विचार करत आहेत किंवा तयारी करत आहेत त्यांनी त्यांचे सर्व सोशल मीडिया प्रोफाइल तपासावेत. तुम्ही अनावश्यक किंवा वादग्रस्त कंटेंट डिलीट करू शकता. तसेच तुमच्या अकाउंटची प्रायव्हसी सेटिंग पब्लिक वर सेट करा. व्हिसा मुलाखतीपूर्वी हे सर्व अपडेट केल्यामुळे तुमचे व्हिसाचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

आता अमेरिकेत शिक्षण घेणे कठीण, ट्रम्प प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा मुलाखतींवर घातली बंदी