
सातपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी रविवारी दुपारी लोंढे टोळीतील आणखी एका सराईताला सापळा रचून अटक केली. या गुह्यातील अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. आयटीआय सिग्नलजवळील औरा बारवरील गोळीबार प्रकरणात सातपूर पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात आतापर्यंत रिपाइ जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, मुलगा दीपक यांच्यासह टोळीतील 13 जणांना अटक करण्यात आली होती. यातील संशयित शुभम चंद्रकांत निकम (25) हा गौळाणे रोड येथील घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून रविवारी दुपारी निकमला अटक केली. त्याच्याविरुद्ध नाशिक तालुका पोलीस ठाण्यात दोन, तर सातपूरला एक गुन्हा दाखल आहे.


























































