आर्याला त्या मार्गावर जाण्यास महायुती सरकारने प्रवृत्त केले, काँग्रेसचा आरोप

महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानातील महत्त्वाचा घटक असणाऱया रोहित आर्या याने इतके मोठे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहित आर्या यांनी जो मार्ग पत्करला तो गुन्हेगारी स्वरूपाचा होता, यात शंका नाही. पण त्या मार्गावर त्याला जाण्यास प्रवृत्त करणारे, त्याला मानसिक रोगी करणारे, त्या स्थितीपर्यंत नेणारे हे महायुतीचे सरकारच असल्याचा आरोप कॉँग्रेस प्रवेत्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

राज्यातील पंत्राटदारांची 89 हजार कोटींची बिले महायुती सरकारकडून थकली आहेत, पण सरकारकडून थकबाकी मिळत नसल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. जलजीवन मिशनचे दीड कोटी थकल्याने सांगलीत हर्षल पाटील याने आत्महत्या केली होती. नागपूरचे पंत्राटदार पी. व्ही. वर्मा यांनीही नुकतीच आत्महत्या केली आणि आता रोहित आर्या ज्याचे 45 लाख रुपये थकले होते. याकडे सचिन सावंत यांनी लक्ष वेधले आहे.

रोहित आर्या याने शिक्षण विभागाच्या दोन योजनांमध्ये काम केले होते, त्याचे काही पैसे थकवले होते असा त्याचा आरोप होता. या प्रकरणात माजी मंत्री व काही अधिकाऱयांची नावे येत आहेत त्याची तसेच एन्काऊंटरची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.