अश्रु आणणारा क्षण…, तब्बल 10 वर्षांनी झाली माय लेकांची भेट

दहा वर्षांचा वनवास संपला, माय लेकाची भेट झाली आणि डोळ्यात आनंदाश्रु दाटून आले. तब्बल 10 वर्षांनंतर आयुष्यातील नवा प्रवास सुरू करताना हरवलेल्या आईची आणि मुलाची योगायोगाने भेट झाली. ही घटना आहे राजस्थामच्या भरतपुरमधील एका आश्रमातील. एक महिला 10 वर्षांपूर्वीच आपला संसार, मुलांना सोडून घरातून निघून गेली होती. यानंतर तिला भरतपुरातील एका आश्रमात ठेवण्यात आले. परिवारातील सदस्यानी अनेक प्रयत्नांनंतर या महिलेचा शोध घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, रूपाबेन उर्फ जमुना असे या महिलेचे नाव आहे. आसाममधील जोरहाट येथील रहिवासी असलेल्या रूपाबेन 2015 मध्ये मानसिक आजारामुळे कोणालाही न सांगता अचानक घराबाहेर पडल्या. कुटुंबाने त्यांचा सर्वत्र शोध घेतला, पण त्या कुठेही सापडल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीय निराश झाले होते. त्यांनी रुपाबेन सापडण्याच्या सर्व आशा सोडल्या होत्या. दरम्यान, 10 वर्षांनंतर त्या राजस्थानमधील भरतपूरमध्ये सापडल्या.

रूपाबेन यांना 2018 मध्ये सुरतहून भरतपूर येथील अपना घर आश्रमात सेवा आणि उपचारांसाठी दाखल करण्यात आले. आश्रमात त्यांच्यावर सतत उपचार सुरू होते आणि जेव्हा त्यांची प्रकृती सुधारली तेव्हा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला. रूपाबेन पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर, त्यांनी त्यांच्या घराचा पत्ता दिला. त्यानंतर आश्रम पथकाने आसाममधील जोरहाट येथील राजबारी गावात त्यांचे घर शोधून काढले.

आश्रम टीमने रूपाबेन आणि त्यांचा मुलगा जयंत नायक आणि तिचा मेहुणा सूरज तांती यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. यावेळी दोघांनीही महिलेची ओळख पटवली. मुलाला त्याची आई जिवंत असल्याचे कळताच, तो लगेचच त्याच्या काकांसोबत तिला घरी परत आणण्यासाठी भरतपूरला गेला. आई आणि मुलाची अखेर भेट झाली. एकमेकांना पाहताच ते खूप आनंदी झाले, त्यांनी एकमेकांना मिठी मारली.

रूपाबेनचा मुलगा जयंतने सांगितले की, जेव्हा त्याची आई घर सोडून गेली तेव्हा तो फक्त 12 वर्षांचा होता. आईच्या जाण्याच्या दुःखाने त्याचे वडीलांचेही निधन झाले. जयंतला आणखी दोन भावंडे आहेत. आई गेल्यानंतर त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते, परंतु आता त्यांच्या आयुष्यात आनंद परत आला आहे. जयंतचे लग्न होणार आहे आणि त्याच्या आईच्या परतण्याने त्यांचा आनंद द्वीगुणित झाला आहे. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, आश्रमाने जयंतच्या आईला तिच्या कुटुंबाकडे सोपवले.