
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवड झाली की, गावोगाव त्याचे सत्कार सुरू होतात. त्याचे म्हणून एक कौतुक असतेच आणि ते असावेदेखील. आता सातारा येथील होणाऱया 99 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आहेत. त्यामुळे त्यांचे सत्कार गावोगावी होत आहेत. अलीकडच्या काही काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फार कुठे फिरकताना दिसत नसत मात्र त्या तुलनेत विश्वास पाटील सत्कारासाठी उत्साहाने जाताना दिसतात.
अशा दोन सत्कारांतील निरीक्षणे नोंदवतो…
डोंबिवलीतील साहित्य परिषद शाखा आणि इतर दहाएक संस्था मिळून एकच नागरी सत्कार करण्याचे ठरले होते. वेळ होती संध्याकाळचे सात. आता सातच का? तर विश्वासराव दुसऱया गावाहून सत्कार स्वीकारून डोंबिवलीला पोहोचायला किमान सात तरी लागतील असे त्यांनी कळवले होते. नाहीतरी डोंबिवलीकर
सहनशीलतेसाठी सुप्रसिद्ध आहेतच. त्यामुळे त्यांनी सात तर सात म्हणून मान्यता दिली, पण सात वाजून गेले आठ वाजून गेले तरी संमेलनाध्यक्षांचा पत्ता नाही. निवेदिकाही आता थोडय़ाच वेळात विश्वास पाटील येतील असं सांगून सांगून तीदेखील कंटाळली. इकडे आयोजक विश्वासरावांशी मोबाईलने संपर्क साधून होते. तेव्हा कळले ते ट्राफिक जाममध्ये अडकले आहेत. तोपर्यंत स्टेजवरची मंडळी विश्वास पाटलांचे लेखन विशेष सांगून वेळ काढत राहिली. शेवटी तर अशी वेळ आली की, आता पाटील येतात की नाही? पण पाटील यांनी कळवले उशीर झाला तरी मी येतो आहे. त्यामुळे मग कार्पामाचे अध्यक्ष पुण्याचे मिलिंद जोशी बोलायला लागले. नेमकं मुद्दय़ाचं आणि औचित्यपूर्ण भाषण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. एरवी रूक्ष असलेला इतिहास विश्वास पाटील यांनी लालित्यपूर्ण पद्धतीने रोचक केला, त्यामुळे ते लोकप्रिय झाले असे ते नेमकेपणाने सांगत राहिले. पण त्यांचे सारे लक्ष दरवाज्याकडे आणि स्टेजवरील मंडळींच्या हातातील मोबाईलकडे. ते पाहत होते विश्वास पाटील केव्हा येतात याच्याकडे. तरी विश्वासरावांचा पत्ता नाही.
इकडे मिलिंद जोशी जुन्या रोचक हकिकती सांगून लोकांना खिळवून ठेवत होते. प्रयत्नांची पराकाष्ठा तीदेखील कंटाळवाणी न करता करत होते आणि नऊच्या सुमाराला एकदाचे आले आले असा गलका होत विश्वास पाटील आले.
तेव्हा मिलिंद जोशी म्हणाले, “अखेर या पानिपतात मी टिकलो.”
एवढं म्हणून त्यांनी तत्काळ माईक पाटील यांच्या हाती दिला.
सांगायचा विशेष म्हणजे एवढा वेळ होऊनसुद्धा डोंबिवलीचे प्रेक्षक जागेवरून हू का चू न करता थांबून राहिले होते.
ज्यांची वाट पाहतात ते भाग्यवान असं म्हणतात. असं प्रेम आहे लेखक विश्वास पाटील यांना लाभलं त्याचंच हे प्रत्यंतर होतं!
तसंच आयत्यावेळी किल्ला कसा लढवावा ते मिलिंद जोशी यांनी दाखवून दिलं होतं.
एरवी ते समयोचित भाषण करण्यात उस्ताद आहेतच, पण डोंबिवलीत त्यांनी जी बाजी जिंकली ती म्हणजे त्यांच्या शिरेपेचातील आणखी एक मोरपिसच आहे.
संस्मरणीय.
दुसरा सत्कार सोहळा ठाण्याला कोकण मराठी साहित्य परिषदतर्फे झालेला. त्यांच्या आमंत्रण पत्रिकेत डॉक्टर विश्वास पाटील असं म्हटलेलं. तेव्हा विश्वासना मी म्हटलं, “ही डॉक्टरेट?” तेव्हा ते म्हणाले, “हो, मी दोस्तोव्हस्कीवर पीएच.डी. केलेली आहे.”
मला वाटतं अशी नोंद प्रथमच होत असावी. समारंभस्थळी विश्वास पाटील यांचे साहित्य सांगणारा बोर्ड लावलेला. ते पाहून मुलाखत घेणारे अशोक बागवे म्हणाले, “पाटील तुम्ही नित्शे चरित्र कधी लिहिले?” तेव्हा पाटील म्हणाले, “तो मी नाही. ते नवी क्षितिजेचे संपादक वेगळे पाटील.”
मग बागवे म्हणाले, “ते गांधींचे पुस्तक कसं लिहिलं?” तेव्हा विश्वास पाटील लगेच म्हणाले, “हा तिसरा वेगळा पाटील.”
…तर विश्वास पाटील नावाचे घोळ अजूनही आहेतच.
अजून संमेलन होईपर्यंत काय काय गमती-जमती होतील ते दिसेल हे पाहायचं. रविप्रकाश कुलकर्णी

























































