आधी पैसे द्या, मगच घरांचा ताबा देऊ; एल्फिन्स्टन पूल बाधितांच्या घराबाबत म्हाडाची भूमिका

वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एमएमआरडीएकडून एल्फिन्स्टन येथे डबलडेकर पूल उभारण्यात येत आहे. या पुलामुळे येथील दोन इमारतींमधील 83 घरे बाधित होणार आहेत. म्हाडाची घरे देऊन एमएमआरडीए रहिवाशांचे पुनर्वसन करणार आहे. मात्र, ‘आधी पैसे द्या…मगच घरांचा ताबा देऊ’, अशी भूमिका म्हाडाने घेतली आहे. घराच्या किमतीसह दुरुस्तीसाठी झालेला दीड कोटींचा खर्च द्यावा, अशी मागणी म्हाडाने एमएमआरडीएकडे केली आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या कामामुळे लक्ष्मी निवास या इमारतीत 60 तर हाजी नुरानी या इमारतीत 23 रहिवासी बाधित होणार आहेत. संबंधित रहिवाशांनी आपल्याला आहे त्याच परिसरात घरे मिळावीत अशी आक्रमक भूमिका घेतल्याने एमएमआरडीएने म्हाडाच्या मालकीची असलेली घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाने दादर, प्रभादेवी, माहीम, माटुंगा, वडाळा, अॅण्टॉप हिल येथील सुमारे 119 घरे एमएमआरडीएच्या अधिकाऱयांना दाखवली. त्यापैकी 83 घरांची निवड केली आहे. रेडीरेकनरच्या 110 टक्के दराने या घरांची पिंमत 97 कोटी रुपये म्हाडाने निश्चित केली आहे. तसेच दुरुस्तीसाठी खर्च झालेले दीड कोटी मिळाल्यानंतरच ही घरे एमएमआरडीएला सुपूर्द करू, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.