
‘पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याचा प्रयत्न हा एक राजकीय कट आहे. मतांसाठी हा वाद उभा केला जात आहे,’ असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार हुमायूं कबीर यांनी बाबरी मशीद उभारण्याची घोषणा केली आहे. या मशिदीची पायाभरणीदेखील काही दिवसांपूर्वी झाली. त्यावर भागवत यांनी भाष्य केले. ‘असा वाद निर्माण करून कोणाचेही भले होणार नाही. यात ना हिंदूंचे भले आहे, ना मुसलमानांचे,’ असे भागवत म्हणाले.
राम मंदिर सरकारी पैशाने बांधलेले नाही!
‘अयोध्येतील राम मंदिर हे सरकारी पैशाने उभारण्यात आलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उभारण्यात आले आहे. न्यायालयाने सरकारला ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले होते. सरकारने तेच केले. त्यानंतर ट्रस्टने जनतेच्या सहकार्याने पैसे गोळा केले. सरकारने दिले नाहीत,’ असे भागवत यांनी सांगितले.
बांगलादेशातील हिंदूंसाठी सरकारने काहीतरी करावे!
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविषयी भागवत यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ‘बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक आहेत. तिथे त्यांची स्थिती कठीण आहे. त्यांनी एकजूट राहायला हवे. जगभरातील हिंदूंनी त्यांना मदत करायला हवी. हिंदुस्थान हा एकमेव हिंदूंचा देश आहे. सरकारने याची दखल घ्यायला हवी आणि काहीतरी करायला हवे,’ अशी अपेक्षा भागवत यांनी व्यक्त केली. मणिपुरातील दोन समाजांमध्ये असलेली दरी कमी व्हायला काही वेळ लागेल, असे ते म्हणाले.

























































