पश्चिम रेल्वे पाच दिवस 350 हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करणार, अतिरिक्त बससेवेसाठी बेस्ट प्रशासनाला पत्र

पश्चिम रेल्वे प्रशासन 26 ते 30 डिसेंबरपर्यंत बोरिवली आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मोठा ब्लॉक घेणार आहे. या पाच दिवसांत 350 हून अधिक लोकल फेऱ्या पूर्णतः रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पश्चिम उपनगरात अतिरिक्त बस सोडण्याची मागणी करीत बेस्ट प्रशासनाला पत्र लिहिले आहे.

सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी दोन्ही स्थानकांवर अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओव्हरहेडशी संबंधित कामे केली जाणार आहेत. त्याचा लोकल ट्रेन आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. पश्चिम रेल्वेने 18 जानेवारीपर्यंत ब्लॉक जाहीर केला असून 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या पाच दिवसांत ब्लॉक राहणार आहे. यामध्ये सुमारे 150 गाडय़ा अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी बोरिवली ते चर्चगेट आणि बोरिवली ते विरार मार्गावर अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्याची विनंती पश्चिम रेल्वे प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला केली आहे.

आरटीओची रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर करडी नजर

पश्चिम रेल्वेची सेवा मोठय़ा प्रमाणावर विस्कळीत होणार असल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालक प्रवाशांकडून मनमानी भाडेआकारणी करू शकतात. या पार्श्वभूमीवर आरटीओची विशेष पथके सतर्क राहणार आहेत. ज्या प्रवाशांच्या रिक्षा किंवा टॅक्सीचालकांविरोधात तक्रारी असतील, ते प्रवासी आरटीओच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकतात, असे अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी सांगितले.

भाईंदरपर्यंत धावणार बेस्टच्या अतिरिक्त सेवा

पश्चिम रेल्वेच्या विनंतीला अनुसरून बेस्ट उपक्रमाने चर्चगेटपासून भाईंदरपर्यंत अतिरिक्त बसफेऱया चालवण्यास तयारी दर्शवली आहे. रेल्वे प्रशासन 24 डिसेंबरला ब्लॉकचे वेळापत्रक देणार आहे. त्यानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त बसफेऱया चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती बेस्टच्या मागाठाणे आगाराचे व्यवस्थापक राजेश पांडे यांनी दिली.